२७ शाळांमध्ये शिक्षक नाहीत
By Admin | Updated: September 26, 2014 23:34 IST2014-09-26T22:27:54+5:302014-09-26T23:34:01+5:30
शैक्षणिक सत्र : पालकांची चिंता वाढली, अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची भीती

२७ शाळांमध्ये शिक्षक नाहीत
रत्नागिरी : पहिले शैक्षणिक सत्र संपले तरी जिल्ह्यातील २७ शाळांमध्ये अद्याप एकाही शिक्षकाचा पत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात दिसून येत आहे. जवळच्या गावातील किंवा वाडीतील शिक्षकांकडे संबंधित शाळांची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आल्याने पालकवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत व आरटीई कायद्यानुसार शिक्षण सक्तीचे करण्यात आले. एकीकडे शिक्षणाचा प्रसार शासन करीत आहे. शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना दुसरीकडे विद्यार्थी शाळेत असताना शिक्षकांचाच पत्ता नाही. शाळेचे पहिले शैक्षणिक सत्र संपले आहे. काही शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एक तारखेपासून सहामाई परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षा तोंडावर असताना संबंधित शाळांमध्ये अद्याप शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल का, अशी भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. काही शाळांमध्ये एकापेक्षा अधिक शिक्षक आहेत. परंतु जिल्ह्यातील २७ शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे बाजूच्या शाळेतील शिक्षकांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबरोबरच इतर विविध शैक्षणिक उपक्रम राबवावे लागतात. त्यामुळे शैक्षणिक अध्यापन तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पूर्ण करीत असताना अतिरिक्त शाळांमधील शिक्षकांचे अध्यापन कसे पूर्ण करायचे हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. छोट्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो, परंतु तसे होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात दिसून येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन हजार ७४८ शाळा असून, ९ हजार ५०० इतकी शिक्षकांची संख्या आहे. मंडणगड व लांजा तालुक्यात प्रत्येकी एक, दापोली, खेड, चिपळूण तालुक्यात प्रत्येकी दोन राजापूर तालुक्यात चार, रत्नागिरी तालुक्यात १५ मिळून एकूण २७ शाळांमध्ये शून्य शिक्षक दिसून येत आहेत. अन्य तालुक्यांपेक्षा रत्नागिरी तालुक्यात शून्य शिक्षकांच्या सर्वाधिक शाळा आहेत.
शैक्षणिक सत्र संपले असून, लवकरच सहामाही परीक्षा सुरू होणार आहेत. परंतु शिक्षकांची आस्थापना सूची ३० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. संबंधित शिक्षकांची सूची मंजूर झाल्यानंतरच जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांची पदे मंजूर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शून्य शिक्षक असलेल्या शाळांवरील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)