जनतेची घरे उद्ध्वस्त करणारे प्रकल्प नको
By Admin | Updated: November 5, 2014 00:04 IST2014-11-04T21:33:40+5:302014-11-05T00:04:52+5:30
विनायक राऊत : उपवडे गावाला भेट, समस्या सोडविण्याचे आश्वासन

जनतेची घरे उद्ध्वस्त करणारे प्रकल्प नको
कुडाळ : ज्या प्रकल्पांपासून फायदा नाही, जनतेची घरे उद्ध्वस्त होत असतील, येथील जनतेला त्रास होणार आहे, असे प्रकल्प या मतदारसंघात आणणार नाही. दत्तक घेतलेल्या शिवापूर गावाचा आदर्श गाव बनविताना येथील इतर गावांचाही विकास होण्याकडे विशेष लक्ष देईन, असे आश्वासन उपवडे येथील गावभेट सभेत खासदार विनायक राऊत यांनी दिले.
खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ तालुक्यातील उपवडे गावाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, भाई देऊलकर, उपवडे येथील महादेव उर्फ आबा राऊळ, पांडुरंग दळवी, संजय कविटकर, अनिल वायंगणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत यांनी उपवडे गावची ग्रामदेवता श्री देवी पावणाई रवळनाथाचे दर्शन घेतले. याच मंदिरात सभा झाली.
यावेळी उपवडे ग्रामस्थांनी राऊत यांच्यासमोर गावातील समस्या मांडल्या. उपवडे येथील रस्त्याची अवस्था बिकट आहे. येथील नदीनाल्यांवरील पूल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात पुलांवरून पाणी जाते. अशा घटनांमध्ये आतापर्यंत तिघेजण वाहून गेले आहेत. उपवडेवासीयांच्या समस्यांकडे सर्वानीच दुर्लक्ष केले आहे. किमान येथील रस्ते, पूल, एसटी बस फेऱ्या आदी सुविधा चांगल्या दर्जाच्या आणि सुरळीत मिळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नवीन कॉजवे तयार करण्यासाठी काही ठेकेदारांनी येथील ब्रिटिशकालीन मोऱ्या सुरूंग लावून फोडल्या. परंतु नवीन बांधलेले कॉजवेही मोकडळीस आले असल्याने जुन्या मोऱ्याच चांगल्या होत्या, असे म्हणण्याची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी खासदार राऊत म्हणाले, शिवापूरसह आजूबाजूच्या गावातील रस्ते आणि इतर आवश्यक बाजंूचाही विकास व्हावा, या उद्देशाने शिवापूर हे दुर्गम गाव दत्तक म्हणून घेतले आहे, असे स्पष्ट केले. यासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन यावेळी राऊत यांनी दिले. (प्रतिनिधी)
उपवडेत खासदार पहिल्यांदाच
यावेळी उपवडे गावचे ज्येष्ठ नागरिक विश्राम दळवी म्हणाले, देश स्वतंत्र होऊन साठ वर्षे उलटली. परंतु उपवडे गावात एकही खासदार किं वा आमदार आला नव्हता. उपवडे गावात येणारे राऊत हेच पहिले खासदार असून हा दुर्मीळ योग असल्याचे दळवी यांनी सांगितले.