...तर मच्छिमारांवर कारवाई
By Admin | Updated: August 1, 2015 00:36 IST2015-07-31T22:30:31+5:302015-08-01T00:36:47+5:30
पोलीस अधिक्षकांचा इशारा : कायदा हातात घेऊ नका

...तर मच्छिमारांवर कारवाई
मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन व पारंपारिक मच्छिमार यांच्यात कायम संघर्ष उद्भवतात. १ आॅगस्टपासून सर्वत्र मासेमारी सुरु होत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मत्स्य विभाग व बंदर विभाग अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शुक्रवारी सूचना दिल्या आहेत. कायदा हातात घेणाऱ्या मच्छिमारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊन पर्ससीन किंवा पारंपरिक मच्छिमारांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिंदे यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मासेमारी हद्दी व विनापरवाना मासेमारी वरून समुद्रात, किनारपट्टीवर मच्छिमारांत संघर्ष भडकला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी मत्स्य विभाग व बंदर विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. याबरोबरच असे संघर्ष यापुढे घडून आल्यास कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. असे सांगत सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. मालवण तालुक्यात गेल्या काही दिवसात ५ ते ६ ठिकाणी मंदिरातील फंडपेट्या चोरट्यांनी फोडल्या. याबाबत चोरट्यांचा काही सुगावा लागला का, असे विचारले असता ते म्हणाले पोलिसांच्यावतीने रात्रीची गस्त व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जातात. मात्र, गावागावात मंदिरांची मोठी संख्या आहे. याठिकाणी असणाऱ्या चीज वस्तू यांच्या संरक्षणा बाबत मंदिर प्रशासनाने जागरूकता दाखवणे गरजेचे आहे. असे त्यांनी
सांगितले. (वार्ताहर)
गस्ती नौका १ सप्टेंबरपासून
समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या गस्तीनौका या महत्वाच्या भूमिका बजावतात. शासनाचा मासेमारी बंदी कालावधी ३१ जुलैला संपत असून १ आॅगस्ट पासून मासेमारी सुरु होणार आहे. समुद्रातील हवामान नारळी पौर्णिमेपर्यंत पोषक नसल्याने पोलिसांच्या गस्ती नौका १ सप्टेंबरपासून नेहमीप्रमाणे सुरु होतील, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
समुद्रात काही संशयास्पद जहाज व अन्य संशयास्पद वस्तू दिसून आल्यास १०९३ या टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा.
पोलीस स्थानक, मत्स्य, बंदर कार्यालयांना भेट
जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी प्रथमच मालवण पोलीस ठाण्यास भेट दिली.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन व पारंपारिक मच्छिमार यांच्यात कायम संघर्ष उदभवतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मत्स्य विभाग व बंदर विभाग अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शुक्रवारी सूचना दिल्या आहेत.