रत्नागिरीनजीक स्वयंभू रामेश्वर मंदिरात चोरी
By Admin | Updated: October 26, 2014 00:09 IST2014-10-26T00:07:37+5:302014-10-26T00:09:10+5:30
दानपेटी फोडून २५ हजार पळवले; चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंद

रत्नागिरीनजीक स्वयंभू रामेश्वर मंदिरात चोरी
रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी गावातील स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिरातील चोरट्याने दानपेटी फोडून सुमारे २५ हजार रुपये लंपास केले़ मात्र, चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये आल्याने संशयित आल्याने चोरीचा लवकरच छडा लागणार असल्याची शक्यता आहे़ ही घटना शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली़
ऐन दिवाळीच्या रात्री काळबादेवी येथील स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिरात चोरट्याने दानपेटी लुटल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे़ शुक्रवारी सकाळी या मंदिराचे गुरव नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी मंदिरात गेले़ त्यावेळी दानपेटी फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी तत्काळ देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाश शेट्ये यांना याबाबत माहिती दिली. घटनेची खबर मिळताच काही वेळातच प्रकाश शेट्येंसह इतर विश्वस्त सुनील मयेकर, रोहिदास मयेकर व अन्य ग्रामस्थ घटनास्थळी मंदिरात आले़ दानपेटीतून चोरट्याने सुमारे २५ हजार रुपये लंपास केले असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
प्रकाश शेट्ये यांनी ग्रामीण स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस लगेचच श्वानपथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले़ मात्र श्वानाला चोरट्याचा शोध घेण्यात अपयश आले़ पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदर चोरटा दिसत आहे. तो या गावातील नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या फूटेजच्या आधारे लवकरच चोरट्याचा शोध घेण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. (शहर वार्ताहर)
खासगी कंपन्याकडून पिळवणूक
रत्नागिरी : खासगी आराम बस कंपन्यांकडून रत्नागिरी-मुंबई तिकिटाचा दर बाराशे रुपयांपर्यंत आकारला जात असल्याने प्रवाशांची ऐन दिवाळीत पिळवणूक होत असल्याची ओरड सध्या सुरु आहे़
दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक चाकरमानी मुंबईतून गावी येत असतात़ तसेच मुलांना सुट्टी असल्याने काही मुंबई, पुणे या ठिकाणी नातेवाईकांकडे फिरण्याच्या उद्देशाने जात असतात़ त्यामुळे रेल्वे व एस़टी़ गाड्यांची तिकिटे मिळत नसल्याने खासगी कंपन्यांच्या लक्झरी बसेसचा आधार घेण्यात येत आहे़ प्रवास आल्हाददायक व आरामात करण्यासाठी प्रवासीवर्गही खर्च करण्यास मागे-पुढे पहात नाहीत़ त्याचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून घेतला जात आहे़
प्रवासी भाडे ५०० ते ६०० रुपये असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सकडून ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांची लूट सुरु आहे़ कारण दिवाळीच्या या दिवसांमध्ये या ट्रॅव्हल्सवाले एका तिकिटासाठी बाराशे रुपयांपर्यंत दर आकारत आहेत़ अशा प्रकारे तिकिटे काळाबाजाराने विकून ग्राहकांची लूट करीत आहेत़ त्याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ हा लुटीचा प्रकार दिवाळीतच नव्हे तर अन्य सणासुदीच्या दिवशी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सुरु असतो. ऐन सणात चाकरमानी कोकणात येतात व परतीच्या प्रवासाला गर्दीला सामोरे जातात अशा वेळी अशी फसवणूक का असा सवाल विचारला जातोय. (शहर वार्ताहर)