भूमिपूजनावरुन श्रेयवाद
By Admin | Updated: November 23, 2014 00:39 IST2014-11-23T00:36:02+5:302014-11-23T00:39:08+5:30
कळणे पुलाचा प्रश्न : काँग्रेस, शिवसेनेकडून वेगवेगळी भूमिपूजने

भूमिपूजनावरुन श्रेयवाद
कसई दोडामार्ग : कळणे-करमळी येथील पुलाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. याच पुलाचे भूमिपूजन नंतर शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस व शिवसेना यांच्यात श्रेयावरून सुरू असलेली चढाओढ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
कळणे -करमळी येथील पुलासाठी एकनाथ नाडकर्णी, प्रमोद कामत यांनी प्रयत्न केले असल्याने शुक्रवारी सकाळी पुलाचे भूमिपूजन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, प्रमोद कामत आदी उपस्थित होते. या पुलाच्या मंजुरीसाठी माजी पालक मंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रयत्न केल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी याच पुलाचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच संपदा देसाई, संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर, तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, पांडुरंग नाईक, उपअभियंता पी. जी. पाटील, ठेकेदार संदीप नार्वेकर, सुनील गवस, संजय गवस, रामदास मेस्त्री, विशाखा देसाई, सज्जन धाऊसकर, मिलिंद नाईक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
४सिंधुदुर्ग-गोव्याला जोडणारे महत्त्वाचे हे पूल आहे. या पुलाचे काम झाल्यास कळणे, तळकट, आडाळी, फुकेरी, उगाडे, झोळंबे या गावांना याचा फायदा होणार आहे. पुलाच्या कामासाठी ग्रामीण दुर्गम निधीतून साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्याचाही समावेश आहे.