आंदोलन सुरूच ठाकर समाज : आजपासून तीव्र होणार
By Admin | Updated: August 14, 2014 22:41 IST2014-08-14T21:31:27+5:302014-08-14T22:41:42+5:30
आमरण उपोषण आणि मुंडण आंदोलन छेडण्यात येणार

आंदोलन सुरूच ठाकर समाज : आजपासून तीव्र होणार
सिंधुदुर्गनगरी : ठाकर समाजाला अनुसूचित जमाती म्हणून प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा होऊनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने ठाकर बांधवांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. तर १५ आॅगस्टपासून हे आंदोलन अधिक तीव्र करत आमरण उपोषण आणि मुंडण आंदोलन छेडण्यात येणार आहे.
ठाकर समाजाला अनुसूचित जमाती (एस. टी.) आरक्षणाच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी ठाकर समाजबांधवांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर साखळी उपोषण सुरु केले आहे. गुरुवारी चौथ्या दिवशी उपोषण सुरु आहे तर १५ आॅगस्ट रोजी शासनाचा निषेध करण्यासाठी ठाकर बांधव मुंडण करणार आहेत. तसेच आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
ठाकर समाज (एस.टी.) आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालकमंत्री नारायण राणे यांच्याशी आपल्या मागणीबाबत चर्चा केली. त्यांनी मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहील. केवळ आश्वासनावर आमचे आता समाधान होणार नाही. कारण यापूर्वी अनेकदा अशी आश्वासने मिळाली होती.
मात्र, अद्याप पूर्तता झालेली नाही. तरी जोपर्यंत अनुसूचित जमाती म्हणून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा निर्धार केला आहे. तर हे आंदोलन १५ आॅगस्ट रोजी अधिक तीव्र करून साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्यात येणार आहे. तर शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी बहुसंख्य ठाकर बांधव आपले मुंडण करून घेतील अशी माहिती आंदोलनकर्त्या ठाकर बांधवांनी दिली. (प्रतिनिधी)