दहशतवादाचा बुरखा कुडाळच्या जनतेने फाडला
By Admin | Updated: April 20, 2016 01:13 IST2016-04-19T23:16:50+5:302016-04-20T01:13:54+5:30
जयेंद्र परूळेकर : पालकमंत्र्यांवर टीका ; यापुढील निवडणुकीतही जनता काँग्रेसच्याच पाठीशी राहणार

दहशतवादाचा बुरखा कुडाळच्या जनतेने फाडला
सावंतवाडी : एका पक्षाचे पालकमंत्री, खासदार, आमदार असतानाही कुडाळात युतीला जनतेने नाकारले आहे. याचाच अर्थ या जिल्ह्याने पुन्हा नारायण राणे यांचे नेतृत्व स्वीकारले असून, यापुढच्या निवडणुकांमध्येही जनता काँगे्रस आघाडीच्याच पाठीशी राहणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे दहशतवादाचा बागुलबुवा करून निवडून आले. मात्र, निवडून आल्यावर जनतेने त्यांना ओळखले असल्यानेच कुडाळमधून त्यांना नाकारले, असा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी केला.
ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.
कुडाळात जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत देत सत्तेवर आणले. जनतेला विकास कोण करू शकतो, हे कळले आहे. काही उमेदवार आमचे थोडक्या मतांनी पडले आहेत. असे असले तरी जनतेने जो कौल दिला, तो आम्हाला मान्य असून, जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच असल्याचे यातून दिसून येत आहे.
अनेक प्रकल्प युती शासनाच्या काळात बंद आहेत. हे जनतेने ओळखले आहे. यांचे आमदार टक्केवारीतच गुंतले आहेत. त्यामुळे दर्जेदार विकास कामेही होत नाहीत, असा आरोपही यावेळी डॉ. परूळेकर यांनी केला आहे.
कुडाळात युतीचा झालेला पराभव हा त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, आता युतीच्या नेत्यांना कुडाळात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही. नेहमी केसरकर काँग्रेसवर दहशतवादाचा आरोप करीत राहिले. दहशतवादाचा आरोप करून जनतेला त्यांनी फसवले. पण पालकमंत्री झाल्यावरही जनतेत जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेने पूर्णत: शिवसेनेच्या कारनाम्यांना वैतागली असून, त्यांनी आपले उत्तर मतपेटीतून दाखवून दिले आहे. यापुढच्या निवडणुकांमध्येही जनतेच्या अपेक्षित कामांना न्याय देऊ. या जिल्ह्याचा विकास राणेच करू शकतात, हे जनतेला आता कळले असून, जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिल्याचे डॉ. परूळेकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)