जुळ्या बहिणींनी मिळवलेले दहावीतील गुणही सारखेच
By Admin | Updated: June 22, 2014 18:46 IST2014-06-22T01:36:10+5:302014-06-22T18:46:39+5:30
दोघींनीही ८८.८० टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक

जुळ्या बहिणींनी मिळवलेले दहावीतील गुणही सारखेच
सागर पाटील ल्ल टेंभ्ये
जुळी भावंड दिसायला सारखी असतात, त्यांच्या वागण्या-बोलण्यात सारखेपणा असतो, बऱ्याचदा त्यांच्या आवडी-निवडीही सारख्याच असतात, हे आपल्याला माहिती आहे. पण जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत सारखेच गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळवला आहे, हे मात्र दुर्मीळच. ही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली आहे रत्नागिरी तालुक्यातील महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर हरचिरी उमरे येथे. या शाळेतील रिद्धी व सिद्धी शिंदे या जुळ्या भगिनींनी एक अनोखा विक्रम केला आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत दोघींनीही ८८.८० टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
रिद्धी व सिद्धी या दोघी बहिणींनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध अभ्यास केला. शाळेचा अभ्यास वेळच्यावेळी करुन उर्वरित वेळ अन्य विषयांच्या अभ्यासाला दिल्याचे या बहिणींनी सांगितले. विशेष बाब म्हणजे शाळेत झालेल्या सर्व परीक्षांमध्ये या दोन बहिणींच्या गुणांमध्ये केवळ एक ते दोन गुणांचाच फरक असल्याचे पहायला मिळत होते. दोघींनी शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त जादा अभ्यासाचे नियोजन केले होते. शाळेचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर दररोज एका विषयाच्या अभ्यासाला एक ते दीड तास वेळ त्या देत होत्या. घरातील वातावरण अभ्यासाला पूरक असल्याने अभ्यासाचे नियोजन करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व शालेय व सहशालेय उपक्रमांमध्ये दोघींचाही उत्स्फूर्त सहभाग होता. विशेष म्हणजे अभ्यासाबाबत कोणतीही शंका मनात राहणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. दोघींनी एकमेकींशी चर्चा करुन अभ्यास समजावून घेण्याचा प्रयत्न केला. दोघींनी एकमेकींचा अभ्यास घेतला. शाळेमध्ये शिकवलेल्या घटकावर घरात एकमेकींशी चर्चा करुन तो घटक अधिक चांगल्या पद्धतीने स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न या बहिणींनी सातत्याने केला. शाळेमधील शिकवणीशिवाय अन्य कोणताही अध्ययनाचा मार्ग नसल्याचे त्यांना पुरेपूर माहीत होते. यामुळे शाळेतील अध्यापनाकडे त्यांनी पूर्णत: लक्ष दिले. शाळेत शिकवला जाणारा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
शाळेमध्ये केवळ सख्ख्या बहिणी म्हणून नव्हे तर चांगल्या मैत्रिणी म्हणून त्या वावरल्या. घरात अभ्यासाप्रमाणे कामातही एकमेकींना मदत करुन अभ्यासासाठी जास्त वेळ मिळवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण यशाचे सर्व श्रेय त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिर्के, सर्व अध्यापक व आई वडिलांना दिले आहे. या दोघी बहिणींनी पुढील शिक्षण शास्त्र शाखेतून घेण्याचे निश्चित केले आहे. यापुढे देखील मैत्रिणींप्रमाणे एकमेकीला सहकार्य करुन असेच देदीप्यमान यश मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रातही रिध्दी, सिध्दीने मिळविला प्रथम क्रमांक
टेंभ्ये या परीक्षा केंद्रांवर कै. बा. रा. नागवेकर तथा हातिसकर मास्तर माध्यमिक विद्यालय, टेंभ्ये म. गांधी दुय्यम शिक्षण मंदिर, हरचिरी, उमदे व आदर्श हायस्कूल, कुरतडे या तीन शाळांचे परीक्षा देतात. रिध्दी, सिध्दी या बहिणींनी शाळेतील प्रथम क्रमांकाबरोबरच केंद्रातही प्रथम क्रमांक मिळविला आहे. एकाच दिवशी जन्म झालेल्या या बहिणी दिसायलाही एकसारख्याच आहेत. योगायोग म्हणजे त्यांनी मिळवलेले गुणही एकच आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.