विद्यार्थ्याला शाळेतून बाहेर काढल्याने तणाव

By Admin | Updated: August 8, 2014 00:39 IST2014-08-08T00:09:28+5:302014-08-08T00:39:48+5:30

सावंतवाडीतील घटना : पालक-शाळा वाद ; हमरातुमरीमुळे तणावाची परिस्थिती

Tension after expelling student from school | विद्यार्थ्याला शाळेतून बाहेर काढल्याने तणाव

विद्यार्थ्याला शाळेतून बाहेर काढल्याने तणाव

सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या वाढीव फी विरोधात आवाज उठविल्याने वासिम शेख यांच्या मुलाला गेले आठवडाभर शाळेतून बाहेर काढले जात असल्याच्या निषेधार्थ पालकांनी सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ठिय्या मांडला. तसेच संचालक व शाळेच्या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. अखेर सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू शाळेत दाखल होत याप्रकरणी शुक्रवारी तोडगा काढू, असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. पण, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.सेंट्रल इंग्लिश स्कूलचा सीनिअर केजीचा विद्यार्थी सनम वसिम शेख हा गेली दोन वर्षे सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. यावर्षी त्याला सिनियर केजीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात वाढीव फी विरोधात काही पालकांनी सह्यांची मोहीम राबविली. त्यात वसिम शेख यांनीही यावर सही केली. त्याचाच राग ठेवून या शाळेमधील स्थानिक समितीने वसिम शेख यांच्या मुलाला गेले आठवडाभर बाहेर बसवून ठेवले. याबाबत काही पालकांनी संस्थेच्या काही संचालक तसेच शिक्षकांना जाब विचारला. मात्र, यावर तोडगा निघाला नव्हता. गुरूवारी सनम शेख या विद्यार्थ्याला बाहेर काढले आणि शाळेच्या अंगणात खुर्चीवर बसवून ठेवून पालकांना बोलावले. त्यावेळी तेथे पालक दाखल झाले आणि त्यांनी जोपर्यंत माझ्या मुलाला शाळेत प्रवेश दिला जात नाही. तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेविका अफरोझ राजगुरू, अ‍ॅड. सनम खोजा, डायमंड शेख आदींनी शिक्षकांना जाब विचारला. मात्र, तेही यावर उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनीही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. यावेळी तेथे संचालिका निलोफर बेग या दाखल झाल्या, पण त्यांनाही पालकांनी धारेवर धरले. यावेळी पालक व बेग यांच्यात हमरातुमरी झाल्याने बेग निघून गेल्या.
अखेर हा वाद चिघळत जात असतानाच संस्थेचे काही पदाधिकारी उद्योगमंत्री नारायण राणे यांना भेटले. त्यांनी पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांना लक्ष घालण्यास सांगितले. त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना घटनास्थळी पाठवले. त्यावेळी त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते संस्था पदाधिकाऱ्यांच्या बाजूने जमा झाले होते. तर पालकही तेवढ्याच संख्येने आले होते. दोघेही ऐकामेकांवर जोरदार तोंडसुख घेत होते. पोलिसांची फौज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पोलिसांनी कडक भूमिका घेण्याचे संकेत देत या वादावर शुक्रवारी रितसर तोडगा काढू. तुम्ही सर्वांनी शांत व्हा, अशी विनंती दोन्ही बाजूना पोलिसांनी केली. आणि या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजीन लोबो, शब्बीर मणियार, गुरू पेडणेकर आदीसह पालक उपस्थित होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक व्ही. एन. चौबे, पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार आदी अधिकाऱ्यांसह संतोष नांदोस्कर, सूरज तांडेल, अमोल सरंगळे, अमर नारनवर, दाजी सावंत आदी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Tension after expelling student from school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.