आमदारांची तहसीलमध्ये ठाण
By Admin | Updated: June 10, 2016 00:15 IST2016-06-09T23:58:58+5:302016-06-10T00:15:27+5:30
मालवणमधील प्रकार : प्रलंबित दाखले वितरणाची वैभव नाईकांची मागणी

आमदारांची तहसीलमध्ये ठाण
मालवण : मालवण तहसील कार्यालयात इंटरनेट, जनरेटर सुविधा कोलमडल्याने विद्यार्थ्यांना वितरीत केले जाणारे विविध दाखले वेळेत मिळत नसल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे पालक वर्गाने केली. या पार्श्वभूमीवर गुरूवारी आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालय येथे ठाण मांडून बंद यंत्रणा कार्यान्वित करत विद्यार्थ्यांचे ९८ दाखले वितरीत करण्याची नोंद महसूल प्रशासनामार्फत केली आहे.
दरम्यान, विविध जातीचे तसेच नॉन क्रिमिलेअर स्वरूपाचे हे ९८ दाखले पुढील कार्यवाहीसाठी गुरुवारी सायंकाळी प्रांताधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले असून लवकरच ते विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसात विविध ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत दाखले वितरीत व्हावेत यासाठी महसूल प्रशासनाने गतिमान कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या आहेत. याबाबत विद्यार्थी व पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.
गेले काही दिवस विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची होणारी परवड लक्षात घेता आमदार नाईक यांनी गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे उपस्थिती दर्शवली. रखडलेल्या दाखल्याबाबत नायब तहसीलदार जी. के. सावंत, एस. पी. खडपकर, शुभांगी चव्हाण यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी तहसील कार्यालयाकडे विद्यार्थ्यांचे तब्बल २९१ दाखले प्रलंबित असल्याची माहिती समोर आली. वारंवार खंडित होणारी इंटरनेट सुविधा, कमी दाबाचा व खंडित वीज पुरवठा, बंद जनरेटर अशा अनेक कारणांमुळे दाखले वितरीत होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विविध दाखल्यांसाठी आजही मोठ्या संख्यने विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होता. यावेळी सेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बीएसएनएल व वीज कर्मचाऱ्यांना बोलावून इंटरनेट व वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात जो पर्यंत जास्तीत विद्यार्थ्यांच्या दाखले नोंदीची कार्यवाही होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयात ठाण मांडण्याची भूमिका आमदार नाईक यांनी घेतली. सायंकाळी जातीचे दाखले ७१ व नॉन-क्रिमिलेअर २७ दाखले असे ९८ दाखले प्रांताधिकारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)