रत्नागिरीतील शिक्षकांचे मुंबईत प्रदर्शन
By Admin | Updated: April 23, 2015 00:10 IST2015-04-22T23:12:24+5:302015-04-23T00:10:08+5:30
चित्रकलेचा ठेवा : नेहरू आर्ट सेंटर गॅलरीमध्ये होणार कार्यक्रम

रत्नागिरीतील शिक्षकांचे मुंबईत प्रदर्शन
रत्नागिरी : शहरातील माध्यमिक शाळांमधील तीन चित्रकला शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील नेहरु आर्ट सेंटर गॅलरीमध्ये भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. २८ एप्रिल ते ४ मे अशा आठवडाभराच्या कालावधीसाठी ठेवण्यात आले आहे.
शहरातील पटवर्धन हायस्कूलचे कलाशिक्षक रुपेश पंगेरकर, जी. जी. पी. एस.चे कलाशिक्षक विश्वेश टिकेकर आणि फाटक हायस्कूलचे कलाशिक्षक दिलीप भातडे हे तिन्ही कलाशिक्षक चांगले चित्रकार आहेत. आपल्या कौशल्यातून त्यांनी अनेक चित्रे रंगवली आहेत. या तिघांनी एकीचे बळ काय असते, याचा विचार करुन नवीन गु्रपची स्थापना केली आहे.
या तिन्ही शिक्षकांनी अनेकदा शहरामध्ये चित्रकला प्रदर्शन भरवून रत्नागिरीकरांची मनं जिंकली आहेत. रत्नागिरीत आपल्या जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी नवीन गु्रपच्या माध्यमातून मोठ्या शहरात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आणि मुंबईतील नेहरु आर्ट सेंटर गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरविण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यावेळी त्यांना नावाजलेल्या चित्रकारांचेही मार्गदर्शन लाभेल, असा विश्वास या तिघांनीही व्यक्त केला.
मोठमोठ्या शहरांमध्ये आर्ट गॅलरी आहेत. त्याप्रमाणे रत्नागिरी शहरातही आर्ट गॅलरी सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी पटवर्धन हायस्कूलमध्ये आर्ट गॅलरी सुरु करण्यासंदर्भात संचालक मंडळाशी बोलणी सुरु असल्याचे कलाशिक्षक रुपेश पंगेरकर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)