शिक्षक संघटना न्यायालयात जाणार

By Admin | Updated: July 20, 2014 22:12 IST2014-07-20T21:57:15+5:302014-07-20T22:12:10+5:30

वेतन रोखून धरल्यास

Teachers association goes to court | शिक्षक संघटना न्यायालयात जाणार

शिक्षक संघटना न्यायालयात जाणार

कुडाळ : शालार्थ वेतन प्रणालीचे काम पूर्ण न झाल्यास प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन प्रदान करणार नाही, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. याबाबत कुडाळ तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांची कोणतीही चूक नसताना वेतन रोखून धरल्यास न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
शिक्षण विभाग प्रशासनाने शालार्थ वेतन प्रणालीप्रमाणे आॅनलाईन वेतन प्रदान करण्यासाठी जी प्रशासन स्तरावरून कार्यवाही करावयाची होती, ती वेळीच न केल्यामुळे शालार्थ वेतन प्रणालीचे काम पूर्ण झालेले नाही. ती जबाबदारी मास्टर ट्रेनर्स व मुख्याध्यापकांवर ढकलून नियमबाह्यरित्या जून महिन्याचे वेतन १७ दिवस रोखून धरले. १५ जुलै रोजी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना ७ नोव्हेंबर २०१२ व २९ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन ही चूक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख अगर मास्टर्स ट्रेनरची नसून प्रशासनाची आहे, हे निदर्शनास आणून दिल्यावर १७ दिवसांनी वेतन देण्यात आले. असे असूनही शालार्थ वेतन प्रणालीचे काम पूर्ण न झाल्यास जुलै महिन्याचे वेतन प्रदान करणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिल्याने सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांमधून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष धोंडू रेडकर, महेश गावडे, राजा कविटकर, नंदकुमार राणे यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Teachers association goes to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.