प्रेरणा देण्याचे काम शिक्षकांनी करावे
By Admin | Updated: March 30, 2015 00:28 IST2015-03-29T21:18:28+5:302015-03-30T00:28:05+5:30
विजयकुमार फातर्पेकर : कणकवली कॉलेजमध्ये मार्गदर्शन

प्रेरणा देण्याचे काम शिक्षकांनी करावे
कणकवली : अध्यापन करताना शिक्षकांनी मुलांना चार भिंतींच्या पलीकडील महाविद्यालयाचा परिचय करून द्यायला हवा. आजची मुले खूप हुशार आहेत. त्यांच्या सृजनशक्तीला प्रेरणा देण्याचे काम शिक्षकांनी करायला हवे, असे प्रतिपादन दशावतार लोककलांचे अभ्यासक प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी केले. कणकवली कॉलेजच्या स्टाफ अकादमीने आयोजित केलेल्या ‘चार भिंतींपलीकडील महाविद्यालय’ या विषयावर त्यांनी शुक्रवारी विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे,
स्टाफ अकादमी प्रमुख डॉ. अनिल फराकटे व प्रा. तानाजी पवार उपस्थित होते.डॉ. अनिल फराकटे यांनी प्रास्ताविकात स्टाफ अकादमी हे शिक्षकांच्या विचारमंथनाचे, पाठ्यपुस्तकापलीकडे आपली काही भूमिका असू शकते याची बैठक निश्चित करण्याचे, आपलं काही चिंतन असू शकते ते मांडण्याचे एक व्यासपीठ असल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे म्हणाले, प्रा. फातर्पेकर यांच्या अभ्यासपूर्ण व वैचारिक विवेचनाचा कॉलेजमधील प्राध्यापकांना अध्ययन, अध्यापनासाठी निश्चित उपयोग होईल.
यावेळी प्रा. फातर्पेकर यांनी प्राध्यापकांच्या अध्ययन-अध्यापन, शैक्षणिक पर्यावरण, विज्ञान आणि तत्त्वज्ञान, अणुऊर्जा प्रकल्प आदी विषयांशी संबंधित विविध प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. प्रा. तानाजी पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)