पापलेटवर मालवणातील एजंटांचा ‘ताव’
By Admin | Updated: September 30, 2015 00:04 IST2015-09-29T21:47:31+5:302015-09-30T00:04:19+5:30
कोळंबीही जाळ्यात : व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण

पापलेटवर मालवणातील एजंटांचा ‘ताव’
मालवण : पापलेट मोठ्या प्रमाणात मिळाल्याने खरेदी दारांचीही गर्दी किनाऱ्यावर झाली होती. सदरची पापलेट ६०० ते ६५० किलो दराने विक्रीला जात आहेत. स्थानिक मार्केटमध्ये पापलेट विक्रीसाठीही उपलब्ध झाली होती. मात्र बहुतांश मासळी मुंबई, गोवा, कोल्हापूर मार्केटसाठी पाठविण्यासाठी एजंटांनी खरेदी केल्याचे समजते. मत्स्य खवय्यांनाही खिशाला परवडणाऱ्या दरात पापलेट मासळी मिळाली आहे. पुन्हा अशाच पद्धतीने पापलेटसह किमती मासळी मिळेल या आशेने किनारपट्टीवरील मच्छिमार दर्यास मासेमारीस गेले आहेत. मत्स्य विभागाची गस्त वाढल्याने किनारपट्टीवरील पर्ससीन व परप्रांतीय मच्छिमारांचा धुमाकूळ काहीसा कमी झाल्याने मच्छिमारांच्या जाळीत अपेक्षित मासळी मिळाल्याचे बोलले जात आहे. मत्स्य हंगामाची दमदार सलामी झाल्यानंतरही श्रावणमास आणि गणेशोत्सवामुळे मत्स्य खव्वयांनी मासळीकडे पाठ फिरवली होती. मात्र अकरा दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन झाल्या झाल्या मच्छिमारांच्या जाळ्यात बंपर पापलेट मासळी मिळाली आहे.
समुद्रात शेळीचे वारे आणि हवामानातील बदलामुळे अजूनही काही दिवस पापलेट आणि त्याच्या सोबतीला कोळंबी मासळी मिळणार असल्याची आशा स्थानिक मच्छिमारांमध्ये आहे. त्यामुळे समुद्रातील हवामानातील बदल पापलेटला अच्छे दिन येणार असून मत्स्य खवय्यांनाही खिशाला परवडणा?्या दरात पापलेट मासळी उपलब्ध होत आहे. गणेश विसर्जनानंतर मच्छिमारांच्या जाळीत मिळलेली ही मासळी पाहता मच्छीमारांसह मत्स्य खवय्यांनाही बाप्पाच पावला असल्याचे बोलले जात आहे. गेले चार दिवस पापलेट आणि कोळंबी मासळी मोठ्या प्रमाणात मिळाली असून मासळी लिलाव पद्धतीने विक्री होताना किलोने तसेच तर लॉट (जाळीत मिळालेली सर्व मासळी) पद्धतीने विक्री केली जात होती. मोठ्या प्रमाणात मागणी असलेली पापलेट मासळी मिळाल्याने मच्छिमार व मत्स्य व्यावसायिक आनंदाचे वातावरण आहे. मंगळवारीही सकाळी पापलेट मासळी मच्छिमारांच्या जाळ्यात अडकली. (प्रतिनिधी)
पापलेटला ‘अच्छे दिन’
गणेशोत्सव संपल्याने बाजारपेठेत आता मत्स्य खवय्यांनी मासे खरेदीसाठी गर्दी करायला सुरूवात झाली आहे.
त्यातच आता चांगली मासळी मिळायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मत्स्य खवय्ये आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आणखीन काही दिवस पापलेटला ‘अच्छे दिन’ असल्याचे भाकित मच्छिमारांनी वर्तविले आहे.