अवैध दारूविरोधात ‘टास्क फोर्स’

By Admin | Updated: December 30, 2014 23:29 IST2014-12-30T21:59:42+5:302014-12-30T23:29:12+5:30

थर्टी फर्स्टची पार्श्वभूमी : बांदा पोलीस व उत्पादन शुल्कची संयुक्त मोहीम

Task force against illegal liquor | अवैध दारूविरोधात ‘टास्क फोर्स’

अवैध दारूविरोधात ‘टास्क फोर्स’

नीलेश मोरजकर - बांदा --नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांसाठी गोवा बनावटीची दारु मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येण्याची शक्यता असल्याने या दारू वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क खात्यासह बांदा पोलिसांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र-गोवा सीमेवर दोन्ही खात्यांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून यासाठी सीमेवर ‘टास्क फोर्स’ची निर्मिती करण्यात अली आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतुकीविरोधात तीव्र मोहीम उघडण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत गोवा बनावटीची दारू स्वस्त असल्याने गोवा बनावटीच्या दारूला मोठ्या प्रमाणात मागणी असते. गोव्यातून आडमार्गाने दारू व्यावसायिक ही दारू महाराष्ट्रात आणतात. ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने गोव्यातून दारूचा महापूर जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. ही अवैध दारू वाहतूक रोखायची कशी, याबाबत पोलीस खात्याने विशेष उपाययोजना केल्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी सांगितले. इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर दारू वाहतुकीच्या दृष्टीने अलर्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील देशी पर्यटकांकडून खासगी वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येते. यासाठी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचा सर्रासपणे वापर करण्यात येतो. गोव्यातून येणाऱ्या दारूवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली तपासणी नाका, बांदा -सटमटवाडी, बांदा-दाणोली मार्गावर उत्पादन शुल्क खाते व पोलिसांची पथके दारूव्यावसायिकांवर पाळत ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या तसेच गोव्यात जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची दिवस-रात्र कसून तपासणी करण्यात येत आहे. गोव्यात नववर्ष स्वागताच्या होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा सर्रासपणे वापर होत असल्याने त्यादृष्टीने गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. खासगी आराम बस तसेच खासगी वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याने किरकोळ वाहतूक करणारे दारूव्यावसायिक एसटी बसचा आधार घेतात. यासाठी गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या एसटी बसेसची देखील तपासणी करण्यात येत आहे.
गोव्यातून येणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर टास्क फोर्सची नजर असणार आहे. मात्र, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील आडमार्गांवरूनदेखील दारूजिल्ह्यात आणण्यात येते. या मार्गांवर लक्ष ठेवणे उत्पादन शुल्क तसेच पोलिसांना अशक्य आहे. उत्पादन शुल्क खाते व पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवर विशेष उपाययोजना राबविल्याने अवैध दारू वाहतुकीला निश्चितच आळा बसणार आहे.


सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे करडी नजर
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात येणाऱ्या आणि सिंधुदुर्गातून बाहेर जाणाऱ्या चेकनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
त्यामुळे अवैध दारू वाहतूक रोखणे पोलिसांना सोपे जात आहे.
तसेच उत्पादन शुल्क विभागाने गेल्या काही दिवसात अवैध दारू वाहतुकीबाबत धडक कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Task force against illegal liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.