शिक्षण विभागावर ताशेर
By Admin | Updated: August 5, 2014 23:43 IST2014-08-05T21:16:51+5:302014-08-05T23:43:04+5:30
शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा : शिक्षण समितीच्या सभेत खडाजंगीे

शिक्षण विभागावर ताशेर
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचा आरोप होत असतानाच आता चक्क शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनी ‘शैक्षणिक गुणवत्ता’ या मुद्यावरून शिक्षण विभागावर ताशेरे ओढले. या विषयावरून सभागृहात खडाजंगी झाली. गटशिक्षणाधिकारी सभागृहात केवळ कागदोपत्री माहिती पुरवत असून प्रत्यक्षात मात्र गुणवत्तेबाबत ‘हवेत’ न राहता सद्यपरिस्थितीत गुणवत्तेची स्थिती काय आहे ते पहावे. शिक्षणाधिकारी धाकोरकर यांनी घसरत चाललेल्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर वेळीच रिमोट दाबा, असे आदेशही यावेळी प्रकाश कवठणकर यांनी दिले.
शिक्षण समितीची मासिक सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती प्रकाश कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, स्रेहलता चोरगे, सुषमा कोदे, राजेंद्र म्हापसेकर, विष्णू घाडी, स्वीकृत सदस्य संजय बगळे, फादर लोबो, संतोष पाताडे, समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास कुलाल, सर्व गटशिक्षणाधिकारी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता खालावत जात असल्याचे आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी उदाहरणासह सभागृहात सादर केले असल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनी मंगळवारच्या सभेत शैक्षणिक गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत शिक्षण विभागावर ताशेरे ओढले.
दोडामार्ग तालुक्यातील शाळांची भरारी पथकामार्फत तपासणी केली असता एका शाळेत शिक्षकालाच एक प्रश्न विचारला असता त्यांना त्याचे उत्तर देता आले नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणाधिकाऱ्यांचा शिक्षकांवर वचक राहिलेला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुलांना साध्या प्रश्नाचे उत्तर जर देता येत नसेल तर कठीण परिस्थिती आहे. यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष नसून तुम्ही शाळांवर भेटी देता की नाही? यावर सभापतींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांची ढासळत चाललेली गुणवत्ता रोखण्यासाठी आता शिक्षणाधिकाऱ्यांनी रिमोट दाबावा व शिक्षकांवर वचक निर्माण करीत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा, असे आदेश सभापतींनी दिले.
देवगड तालुक्यात १०१ पदवीधर शिक्षकाची पदे रिक्त असून याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्य विष्णू घाडी यांनी करीत या विभागावर नाराजी व्यक्त केली. देवगडवरच अन्याय होत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावर सभापती प्रकाश
कवठणकर यांनी या विषयावर आपण मार्ग काढू, असे सांगत वादावर पडदा टाकला. (प्रतिनिधी)