तळीवाडी ग्रामस्थांनी अखेर उपोषण सोडले
By Admin | Updated: September 7, 2014 00:37 IST2014-09-07T00:18:02+5:302014-09-07T00:37:17+5:30
लेखी आश्वासन

तळीवाडी ग्रामस्थांनी अखेर उपोषण सोडले
वैभववाडी : भूमी अभिलेख पंचायत समिती व भुईबावडा ग्रामपंचायतीने बंद पायवाटेच्या अधिग्रहण प्रस्तावाद्वारे कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे शुक्रवारी रात्री ११ वाजता तळीवाडीच्या ग्रामस्थांनी आमरण उपोषण सोडले.
भुईबावडा तळीवाडी येथील भूमापन क्रमांक ३३५ मधील पुरातन पायवाट खुली करून मिळावी या मागणीसाठी तळीवाडीचे ग्रामस्थ शुक्रवारी तहसीलसमोर सहकुटुंब उपोषणास बसले होते. त्या अनुषंगाने भूमी अभिलेखचे उपअधीक्षक यांनी तहसीलदार यांच्यासमवेत पुरातन पायवाटेची पाहणी करून अहवाल देण्याचे आश्वासन दिले. तसेच भुईबावडा सरपंच यांनी तळीवाडी रस्ता अधिग्रहण प्रस्ताव ३ महिन्यात सादर केला जाईल. तसेच ही पुरातन पायवाट ग्रामपंचायत दप्तरी नोंद असल्यास ती खुली करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील असे आश्वासन दिले. ग्रामपंचायतीकडून तत्काळ अधिग्रहण प्रस्ताव तयार करून घेऊन सादर केला जाईल असे पंचायत समितीने आश्वासित केल्याने तहसीलदारांच्या विनंतीवरून ग्रामस्थांनी उपोषण सोडले. (प्रतिनिधी)