लाच घेताना साळगावच्या महिला तलाठी गजाआड
By Admin | Updated: October 6, 2014 23:43 IST2014-10-06T23:26:01+5:302014-10-06T23:43:18+5:30
५० हजारांची लाच : दोन दिवसांची पोलीस कोठडी

लाच घेताना साळगावच्या महिला तलाठी गजाआड
कुडाळ : जमिनीच्या सातबारावर नाव चढविण्यासंदर्भात ४० हजारांची लाच स्वीकारताना साळगावच्या महिला तलाठी पूजा प्रकाश प्रभूखानोलकर हिला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असून, तिला अटक करण्यात आली आहे. -कुडाळ तालुक्यातील महिन्याभरातील ही दुसरी कारवाई आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही तलाठी महिला असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. प्रभूखानोलकर यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. साळगावच्या तलाठी म्हणून पूजा प्रभूखानोलकर (पूर्वाश्रमीच्या कृष्णाबाई सामंत) गेली आठ वर्षे काम पाहत आहेत. मुंबई-बदलापूर येथे राहणारे गुरुदास शरद भोजने यांनी साळगाव येथे सहा गुंठे जमीन खरेदी केली होती. जमिनीचे खरेदी खत सात महिन्यांपूर्वी पूर्ण झालेले होते. मात्र, त्यांचे नाव सातबारावर चढले नव्हते जमिनीच्या सातबारावर नाव चढविण्यासाठी गुरुदास भोजने यांंनी ४ आॅक्टोबरला साळगाव तलाठी पूजा प्रभूखानोलकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पूजा यांनी नाव चढवून देण्याकरिता ५० हजार रुपयांची मागणी केली.
गुरुदास भोजने यांनी ही मागणी मान्य केली. पूजा यांचे पती प्रकाश प्रभूखानोलकर यांनी भोजने यांना रविवारी दूरध्वनीवरून रात्री ८ वाजता विष्णूबुवा बिल्डिंग, प्रथमेश कॉम्प्लेक्स येथे राहत असलेल्या खोलीवर पैसे आणण्यास सांगितले.
तलाठी लाच मागत असल्याची तक्रार रविवारी भोजने यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. त्यानुसार पैसे देण्याच्या ठिकाणाकडे लाचलुचपतचे उपअधीक्षक जगदीश सातव यांनी पोलिसांना घेऊन सापळा रचला. रात्री ८ वाजता पूजा यांचे पती प्रकाश यांनी सांगितलेल्या ठिकाणी भोजने रक्कम घेऊन गेले. ही रक्कम पूजा यांच्या घरी देतानाच लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूजा प्रभूखानोलकर यांना रंगेहात पकडले. वीस दिवसांतील दुसरी कारवाई वीस दिवसांपूर्वीच बिबवणे येथील तलाठी मनीषा शिपुगडे यांना चारशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच साळगाव येथील पूजा प्रभूखानोलकर या दुसऱ्या महिला तलाठीला पकडण्यात आले आहे.
गेली आठ वर्षे साळगाव येथे तलाठी पदावर काम करीत असलेल्या पूजा प्रभूखानोलकर यांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींमुळे तहसीलदार जयराज देशमुख यांनी पूजा यांची सेवा वर्ग करून तात्पुरती आस्थापना विभागात बदली केली होती. या प्रकरणात पूजा प्रभूखानोलकर यांचे पती प्रकाश खानोलकर यांचाही हात असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. (प्रतिनिधी)