पाणी अडवून हिवाळी शेती करा : अण्णा हजारे
By Admin | Updated: January 2, 2015 00:07 IST2015-01-01T22:30:19+5:302015-01-02T00:07:08+5:30
कोरडवाहू शेती अभियानासाठी देवडे गावातील सुमारे ५० शेतकऱ्यांनी राळेगणसिद्धी गावाचा अभ्यास दौरा केला

पाणी अडवून हिवाळी शेती करा : अण्णा हजारे
मार्लेश्वर : कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून त्याचे योग्य नियोजन केले तर त्याचा आधुनिक शेतीसाठी वापर करता येणे शक्य आहे, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावच्या शेतकऱ्यांना दिला.
कोरडवाहू शेती अभियानासाठी देवडे गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत गावातील सुमारे ५० शेतकऱ्यांनी नुकताच राळेगणसिद्धी गावाचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी हजारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर दारुबंदी, हुंडाबंदी, वृक्षतोडबंदी, श्रमदान व चराई बंदीची पाच तत्वे सर्वांनी अंगिकारली पाहिजेत, असे अण्णांनी सांगितले. कोकणात दोन दिवस पडणारा पाऊस हा मराठवाड्यातील वर्षभरात पडणाऱ्या पावसाएवढा असतो. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसाचा सदुपयोग हिवाळी शेतीसाठी केला पाहिजे.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होते, असे हिवरे बाजाराचे सरपंच पोपट पवार यांनी सांगितले. देवडे गावातील शेतकऱ्यांनी दौऱ्याची सुरुवात फलटण येथील कृषी उद्यान केंद्र व भाजीपाला संशोधन केंद्राला भेट देऊन केली. यानंतर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रीन हाऊसमधील जरबेरा व कार्निशन या दुर्मीळ व शोभिवंत फुलांची पाहणी केली. त्यानंतर राळेगणसिद्धी गावाला भेट देऊन पाणलोटअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.
या अभ्यास दौऱ्यात संगमेश्वर तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक दत्ताराम परब, सुनील जगदाळे, देवडे गावचे प्रगतशील शेतकरी बंधू बेर्डे, धोंडू लाड, सखाराम धुमक, सुभाष कांबळे, महेश धुमक, दीपक मांडवकर, सोमा तळेकर, सुरेश माईन, विजय वड्ये, जयवंत जाधव, दिलीप बेर्डे, अरुण कांबळे, विकास सुवरे, सुहास धुमक, संतोष मांडवकर, दिनेश बड्ये, चंद्रकांत बड्ये आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)