सेवेत घ्या; अन्यथा उपोषण करणार

By Admin | Updated: November 12, 2014 23:58 IST2014-11-12T20:52:23+5:302014-11-12T23:58:24+5:30

तिलारी प्रकल्पग्रस्त आक्रमक

Take up service; Otherwise, you will fast | सेवेत घ्या; अन्यथा उपोषण करणार

सेवेत घ्या; अन्यथा उपोषण करणार

कसई-दोडामार्ग : तिलारी प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगारांना कामावरून अन्यायकारकरित्या कमी करण्यात आले. कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत सामावून घ्या, अन्यथा १४ नोव्हेंबरपासून कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तिलारी प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष दत्ताराम नाईक यांनी तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही तिलारी प्रकल्पग्रस्त असून आमची घरे, जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. आमच्या घरातील कुणीही व्यक्ती सरकारी नोकरीत कायमस्वरुपी कामाला नाहीत. आम्ही १९८५ ते १९९२ पर्यंत शासनाच्या हजेरी पटावर असताना कार्यकारी अभियंता तिलारी शीर्षकामे क्र. १ कोनाळकट्टा ता. दोडामार्ग या विभागात संपूर्ण जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध कामे केली आहेत. हजेरीपट बंद झाल्यानंतर ही कामे आमच्याकडून ठेकेदारी पद्धतीने करून घेण्यात येत आहेत. या कामासाठी कामगारांची आवश्यकता असताना आम्हाला कायमस्वरूपी हजर करून घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे प्रकल्प वसाहतीत कचरा उचलण्यात आला नाही, पाण्याची टाकी साफ केलेली नाही. दूषित पाणी पिण्यास दिले जात आहे. कचरा आणि घाण वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून रोगराई पसरण्याचा प्रकार सुरू आहे. उर्वरित कामगारांना ३० नोव्हेंबर २०१४ पासून कमी करण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. या आडमुठ्या धोरणामुळे गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रकल्पातील अधिकारी वर्गातील वर्गाकडून न पटणारी कारणे सांगून कामगारांना स्वत:च्या मनाने सेवेतून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे कामगारांची मन:स्थिती ढासळली असून या विरोधात १४ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. उपोषणास बसणाऱ्यांमध्ये अध्यक्ष संतोष दत्ताराम नाईक यांच्यासह सुरेश फटी नाईक, बाळा लाडू लोंढे, सुनील विश्वनाथ शेटवे, सुनील हरिश्चंद्र गवस, महादेव भिकाजी गवस, नितीन गजानन सुतार, तुळशीदास गोपाळ घाडी, नारायण फटी गवस, सुधीर सुरेश पारकर, सुनील आत्माराम सावंत, उदय महादेव नाईक, गणपत भिकाजी गवस, दयानंद वासुदेव गवस, संतोष भिकाजी देसाई, गुरुदास विश्वनाथ शेटवे, सदाशिव महादेव सावंत आदींचा समावेश आहे. निवेदनाची प्रत महाराष्ट्र व गोव्याचे मुख्यमंत्री, गोव्याचे पाटबंधारे मंत्री दयानंद मांजरेकर, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांना दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Take up service; Otherwise, you will fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.