डेंग्यू तापाबाबत योग्य खबरदारी घ्या
By Admin | Updated: November 16, 2014 23:46 IST2014-11-16T21:39:29+5:302014-11-16T23:46:59+5:30
शासकीय रुग्णालयांचा आढावा : डॉक्टरांचे तांत्रिक उपाययोजनेबाबत मार्गदर्शन

डेंग्यू तापाबाबत योग्य खबरदारी घ्या
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्र, शासकीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी तसेच खाजगी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेस सहाय्यक संचालक, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. एम. एम. खलिपे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय. ए. पठाण, खाजगी तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. बी. जी. शेळके, डॉ. गीता मोघे, डॉ. संजीव आकेरकर उपस्थित होते.
डॉ. संजीव आकेरकर यांनी डेंग्यू लागण होण्याची कारणे, त्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी व औषधोपचार याबाबत वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्यकेंद्र, तालुका आरोग्य अधिकारी आदींना तांत्रिक मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने, बालरोगतज्ज्ञ डॉ. ढवळे, जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी हिवताप, डेंग्यू संदर्भात सद्यस्थितीची व सुरु असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय. ए. पठाण यांनी ब्रुसेलोसिस व लेप्टोस्पायरोसीस या आजाराच्या उपाययोजनांबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देऊन याबाबत जनतेने घ्यावयाची खबरदारीची जाणीव करून दिली. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील जवळपास ८ हजार पाळीव जनावरांना ब्रुसेलोसीस प्रतिबंध लसीकरण केल्याचे सांगून ही कार्यवाही अद्यापही सुरु असल्याचे विषद केले. कोल्हापूरचे सहाय्यक संचालक हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. एम. एम. खलिपे यांनी हिवताप, डेंग्यू व इतर तापाच्या रोगाबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत तांत्रिक मार्गदर्शन करून जिल्ह्यात सुरु असलेल्या उपाययोजनांचा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी आजअखेर हिवताप १२३, डेंग्यू ४६, लेप्टोस्पायरोसीस २ असे रुग्ण आढळलेले असून जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना सुरु असून जनतेचेही सहकार्य मिळावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये यांनी केले.
तसेच डेंग्यू, हिवताप, लेप्टोस्पायरोसीस व इतर तापाच्या रुग्णाच्या अनुषंगाने ग्रामीण भागात सुरु असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर क्षेत्रीय आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्यकेंद्र यांची आढावा सभा आयोजित केल्याचे
सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात आढावा बैठक घेणार
२० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २ या वेळेत कुडाळ व दुपारी ३ ते ५.३० या वेळेत वेंगुर्ला, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २ या वेळेत देवगड व दुपारी ३ ते ५.३० या वेळेत वैभववाडी, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २ या वेळेत दोडामार्ग व दुपारी ३ ते ५.३० या वेळेत सावंतवाडी, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते २ या वेळेत कणकवली व दुपारी ३ ते ५.३० या वेळेत मालवण येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी हे आढावा घेणार आहेत.