बाबासाहेबांची प्रेरणा घ्या
By Admin | Updated: November 24, 2014 23:13 IST2014-11-24T22:05:18+5:302014-11-24T23:13:36+5:30
वैभव नाईक : कुडाळ येथे आरपीआयच्यावतीने सत्कार समारंभ

बाबासाहेबांची प्रेरणा घ्या
कुडाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रात क्रांती करा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ आरपीआयच्यावतीने केलेल्या सत्कार समारंभात केले. भारतीय संविधान हे माझ्या वाचनातला ठेवा असून संविधानाप्रमाणेच वाटचाल करून जनतेचा विकास करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
कुडाळ शहर आरपीआयच्यावतीने आमदार वैभव नाईक यांचा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष आत्माराम कुडाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, आरपीआय शहर तालुकाध्यक्ष बाबुराव केळूसकर, महादेव कुडाळकर, रामचंद्र कुडाळकर, वसंत कु डाळकर, जगन्नाथ कुडाळकर, सुशीला कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांचा महादेव कुडाळकर, रामचंद्र कुडाळकर, वसंत कुडाळकर या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भारतीय संविधान तसेच शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबुराव केळूसकर म्हणाले, आरपीआय पक्षाची निवडणुकीत भाजपाशी युती असली, तरी या ठिकाणी एक सच्चा माणूस म्हणून आम्ही आमदार नाईक यांच्या पाठीशी ठामपणे राहिलो. आमच्या नगरातील समस्या, प्रश्न नाईक यांनी मार्गी लावावेत, असे आवाहन त्यांनी केले. राजन नाईक म्हणाले, येथील सर्व प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शिवसेना आमदार, खासदार नेहमी कार्यरत राहणार आहेत. तसेच येथील देवस्थान जमिनीचा प्रलंबित प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जाधव, आभार आनंद पेंडुरकर यांनी मानले. यावेळी आरपीआयचे भूषण कुडाळकर, विक्रम जाधव, अमर कुडाळकर, सागर कुडाळकर, संदेश मालवणकर, महेश तेंडोलकर, विकास कुडाळकर, विजय कुडाळकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार
कुडाळ शहर आरपीआयच्यावतीने केलेला हा सत्कार कुडाळातील माझा पहिला सत्कार असून तो कधी विसरणार नाही, असे सांगून, ज्यांनी तयार केलेल्या घटनेवर भारत देशाचा कारभार चालत आहे, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा येत्या वर्षभरात खासदार राऊत यांच्या सहकार्याने उभारण्याचे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिले.