सिंधु महोत्सव स्थानिक संघाच्या सहकार्यातून घ्या
By Admin | Updated: December 2, 2014 21:26 IST2014-12-02T21:14:17+5:302014-12-02T21:26:51+5:30
अतुल हुले यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधु महोत्सव स्थानिक संघाच्या सहकार्यातून घ्या
वेंगुर्ले : स्थानिक पर्यटन संघाच्या सहभागाने सिंधु महोत्सवाचे आयोजन व्हावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सेवा संस्थेचे अध्यक्ष अतुल हुले यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा होऊन १७ वर्षे पूर्ण झाली, तरी जिल्ह्यात पर्यटन पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना व पर्यटन व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पर्यटन व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींबाबत व उपाय योजनांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे २००९ मध्ये दोन बैठका झाल्या. मात्र, त्यात लिहिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी किती झाली, याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा.
त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही एमटीटीए या संस्थेच्या ५० टूर आॅपरेटर्सना जिल्ह्यात आणून पर्यटन व्यावसायिकांच्या खर्चाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व पर्यटन सुविधांची ओळख करून दिली होती. मात्र, या उपक्रमाकडे प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरविली होती. एमटीटीए या संस्थेने कायमस्वरुपी पर्यटक जिल्ह्यामध्ये पाठविण्याची तयारी दर्शविली होती.
त्यासंदर्भात काही सूचनाही केल्या होत्या. मात्र, प्रशासनाला त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास वेळ मिळाला नाही.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधु महोत्सवाचे आयोजन करताना जिल्ह्याचा नियोजनपूर्वक विकास व्हावा, या दृष्टीने तालुका व गाव स्तरावरील स्थानिक पर्यटन संस्था पर्यटन व्यावसायिकांच्या समित्या तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन कराव्यात, जिल्हा प्रशासन व पर्यटन महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची व्यापक प्रसिद्धी करून एमटीटीएसारख्या टूर आॅपरेटर्समार्फत मोठ्या प्रमाणात पर्यटन पॅकेज टूर पर्यटक जिल्ह्यात आणावेत, पर्यटकांची निवास व भोजन व्यवस्था स्थानिक समितीकडे द्यावी.
हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक समित्यांना आर्थिक सहकार्य करावे,
आदी मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)