‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By Admin | Updated: July 16, 2015 22:59 IST2015-07-16T22:59:19+5:302015-07-16T22:59:19+5:30

गुरुनाथ पेडणेकर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभेत आदेश

Take action against those officers | ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मस्टरवर सही करत नाहीत. बाहेर जाताना हालचाल रजिस्टरवर नोंद करत नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. तरी यापुढे मस्टरवर सह्या व हालचालीबाबत नोंद न करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी आरोग्य समिती सभेत दिले.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सभागृहात पार पडली. यावेळी जान्हवी सावंत, रेश्मा जोशी, प्रमोद कामत, निकिता जाधव, भारती चव्हाण आदी सदस्यांसह खातेप्रमुख, अधिकारी, समिती सचिव तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांना भेटी दिल्या असता वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मस्टरवर सही करत नसल्याचे आणि हालचाल रजिस्टरवर नोंद करत नसल्याचे काही ठिकाणी आढळून आले. मात्र, ही बाब गंभीर आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी थांबणेही तेवढेच महत्वाचे आहे. तरी यापुढे याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी दिले. तर आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही याबाबत दुजोरा देत आरोग्य सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे अशा सूचनाही यावेळी केल्या.
निरवडे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या इमारतीचे ५ लाख रुपये निधी खर्चून काम सुरु आहे. मात्र, या कामाबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. संबंधित ठेकेदाराकडून मनमानी सुरु आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सदस्या निकिता जाधव यांनी आरोग्य समिती सभेत केला. तर या कामाची चौकशी करा व आठ दिवसांत अहवाल सादर करा असे आदेश सभापती पेडणेकर यांनी दिले तर आरोग्य विभागांतर्गत मंजूर कामे व सुरु असलेल्या कामाची माहिती व कामाचे अंदाजपत्रक संबंधित रुग्णकल्याण समितीला देण्यात यावे अशा सूचना यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अधिक चांगली आरोग्यसेवा देता यावी. आरोग्य यंत्रणेत सुसूत्रता यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने योजना तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्रे सुविधायुक्त बनविण्यासाठी कायापालट योजना, जन्मजात आई मृत्यू पावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी ‘सिंधु बालक योजना’ अशा विविध नाविन्यपूर्ण योजना प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूरला वारी करणाऱ्या वारकरी मंडळींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यावर्षीपासून पंढरपूर वारकऱ्यांसाठी सिंधुदुर्ग ते पंढरपूर अशी विशेष आरोग्य सेवा दिली जाईल. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व पुरेसा औषध साठा असलेले पथक दिले जाईल अशीही माहिती यावेळी दिली. ओसरगांव व वैभववाडी येथे डेंग्यूच्या डासाची अळी सापडली आहेत. तेथील बांधकामावरील कामगारांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत पहाणी करून तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती देतानाच जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया अशा साथरोगावर आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोणत्याही साथरोगाची लागण होऊन रुग्ण दगावता कामा नये याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहेत तर आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

जिल्ह्यात २६0 पाणी नमुने दूषित
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून अखेर घेतलेल्या ११३५ पाणी नमुन्यामध्ये २६० एवढे पाणी नमुने दूषित आढळल्याची माहिती देतानाच या कालावधीत पाणी शुद्धीकरणावर भर दिला जात आहे. पाण्यापासून उद्भवणारे आजार पसरू नयेत याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.

Web Title: Take action against those officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.