महिला सबलीकरणाचे प्रयत्न तोकडे

By Admin | Updated: December 26, 2014 00:21 IST2014-12-25T21:31:38+5:302014-12-26T00:21:07+5:30

महिला शक्तीचा आविष्कार

Tactics of women empowerment | महिला सबलीकरणाचे प्रयत्न तोकडे

महिला सबलीकरणाचे प्रयत्न तोकडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध संघटनांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्त्री शक्ती संघटीत करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी म्हणावे तसे संघटन उभे राहिल्याचे अद्यापतरी दिसून येत नाही.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध संस्था तसेच मंडळे कार्यक्रम आयोजित करतात. सरत्या वर्षामध्येही अनेक संस्थांनी उपक्रम आयोजित केले होते. यामध्ये कणकवलीतील मिळून साऱ्याजणी महिला मंच, साज ग्रुप, सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठान अशा संस्थांचा समावेश होता. तर काही शैक्षणिक संस्थांनीही पुढाकार घेऊन उपक्रम आयोजित केले होते. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. तर झाराप येथील भगिरथ प्रतिष्ठानसारख्या संस्थाही महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असतात. त्यामुळे महिला सबलीकरणाला मदतच होत आहे. महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे तसेच स्वसंरक्षणाच्या बाबतीत महिलांनी स्वावलंबी व्हावे, यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरेही जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग तसेच अन्य संस्थांनी वर्षभर आयोजित केली. गतवर्षी सावंतवाडी येथे नोव्हेंबर महिन्यात पहिले महिला साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनामुळे महिला साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध झाले होते. मात्र, यावर्षी असा प्रयत्न आतापर्यंत तरी झालेला नाही. आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविकांनी गेले वर्षभर अधूनमधून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी तसेच ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढले. त्यांच्या या आंदोलनाला काही प्रमाणात यशही मिळाले.


स्त्री भ्रूण हत्या विरोधी अभियान जिल्ह्यात राबविण्यात आले. या अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी भजन स्पर्धेसारखे उपक्रम ठिकठिकाणी राबविण्यात आले. असे असले तरी महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने अजूनही विशेष असे प्रयत्न होणे आवश्यक आहेत.



महिला शक्तीचा आविष्कार
कणकवली : विविध परंपरांनी युक्त अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरी भागात राहणाऱ्या महिलांचे प्रमाण ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांपेक्षा कमी आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या समस्याही वेगवेगळ््या आहेत. महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक महिला छोटे- मोठे व्यवसाय करताना दिसून येतात. कला, क्रीडा, साहित्य आदी क्षेत्रामध्येही आपला वेगळा ठसा अनेक महिलांनी उमटविला आहे. त्यांच्यारूपाने महिला शक्तीचा आविष्कारच अनेकवेळा पहायला मिळतो.


सुधीर राणे

Web Title: Tactics of women empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.