दशक्रिया विधीत लाठ्याकाठ्यांनी हल्ला

By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-28T23:55:13+5:302015-10-29T00:08:11+5:30

आसगे येथील घटना : परस्परविरोधी तक्रारी

Tactical ritual | दशक्रिया विधीत लाठ्याकाठ्यांनी हल्ला

दशक्रिया विधीत लाठ्याकाठ्यांनी हल्ला

लांजा : बहिष्कार टाकलेला असतानाही पिंडदानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या रागातून एक प्रौढ व त्यांच्या दोन तरुण मुलांना नऊजणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी १०.३० वा. आसगे-तेलीवाडी येथे झाला. या प्रकारात आत्माराम पावसकर (वय ५२) व त्यांची दोन मुले नीलेश (२९) आणि गणेश (२३) हे चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
आत्माराम पावसकर व त्यांच्या मुलांचे काही कारणास्तव त्यांच्या वाडीतील स्थानिक मंडळाशी पटत नव्हते. त्यामुळे त्यांना मंडळात बसण्यात, उठण्यात वाडीतील लोकांनी मज्जाव केला होता. दहा दिवसांपूर्वी आत्माराम यांचा चुलत भाऊ संतोष याची पत्नी सविता हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आत्माराम, नीलेश आणि गणेश हे संतोष यांच्या दु:खात सामील झाले होते. मात्र, ही बाब मंडळाच्या लोकांना रुचलेली नव्हती. तसेच तिसऱ्या दिवशी सारीभरण विधीप्रसंगी शाब्दिक चकमक उडाली होती. बुधवारी दहावा दिवस असल्याने
पिंडदानाचा कार्यक़्रम होता. आत्माराम पावसकर उत्तरकार्याच्या ठिकाणी आल्यास वाद निर्माण होऊ शकतो याची कल्पना मंडळाने संतोष पावसकर यांना दिली होती. मात्र ते आपल्या कुटुंबातील असल्याने आपण त्यांना येण्यास मज्जाव करणार नाही, असे संतोष यांनी सांगितले.
पिंडदानाच्या विधीची तयारी झाली होती. आजूबाजूच्या गावातील पाहुणे मंडळी कोल्हेझरी या विधीच्या ठिकाणी हजर होते. याचवेळी आपण आपल्या वडिलांसह हजर राहिलो. तेव्हा वाडीतील ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन आपल्यावर हल्ला चढवला. त्यामध्ये आपले वडील आत्माराम तसेच आपल्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, अशी तक्रार आत्माराम यांच्या मुलांनी लांजा पोलिसांकडे दिली आहे.
सर्व जखमींवर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. संदीप राजाराम चव्हाण (३४), सुनील भाऊ पावसकर (४४), यशवंत सोमा शेलार (६२), अनंत नारायण शेलार (५०), विजय राजाराम चव्हाण (२९), अमोल दत्ताराम शेलार (३५), संदीप यशवंत शेलार (३०) यांनी आपल्यावर हल्ला केल्याचे नीलेश व गणेश यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. संदीप चव्हाण यांनी याप्रकरणी विरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. सविता संतोष पावसकर यांचा दशक्रिया विधी कोल्हेझरी येथे होता. आपण मुलीला घेऊन मोटारसायकलने लांजा येथे शाळेत सोडण्यासाठी जात होतो. मोटारसायकलच्या मागे संदीप यशवंत शेलार बसला होता.
कोल्हेझरी येथे आपली मोटारसायकल आली असता आत्माराम याने संदीप शेलार याला काठीने मारल्याने मोटारसायकल सरकून पडली. आत्माराम व त्यांचे दोन मुलगे आम्हाला मारहाण व शिवीगाळ करत असल्याचे उत्तरकार्यासाठी जमलेल्या लोकांनी पाहिले. त्यांनी तेथून येऊन भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणाचेही ऐकून न घेता या तिघांनी आपणाला मारहाण केल्याची तक्रार चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Tactical ritual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.