मिठमुंबरी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम मंजूर
By Admin | Updated: September 13, 2014 23:25 IST2014-09-13T23:25:53+5:302014-09-13T23:25:53+5:30
राज्यस्तरीय योजनेंतर्गत समाविष्ट

मिठमुंबरी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम मंजूर
पुरळ : मिठमुंबरी बागवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे उर्वरित काम चालू आर्थिक वर्षामध्ये राज्यस्तरीय योजनेंतर्गत कामांमध्ये समाविष्ट केले असून या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निधी उपलब्ध होताच काम करण्यात येईल, असे उत्तर राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कपात सूचनेला दिले आहे.
सन २०१४-१५च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात बंदर विभागाच्या चर्चेवेळी मनसे आमदार बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, प्रकाश भोईर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर यांनी मिठमुंबरी बागवाडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याबाबत कपात सूचना मांडली होती. मिठमुंबरी बागवाडी गावाची समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे होणारी धूप त्वरित थांबविण्यात यावी याकरिता गावातील ग्रामस्थांनी १९८७ पासून आतापर्यंत सातत्याने बागवाडी तरीच्या जेटीपासून समुद्राच्या काठाने बोंडगीनपर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली होती. सद्यस्थितीत मिठमुंबरी बागवाडी येथे १०७० मीटर लांबीचे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. उर्वरित २८० मीटर लांबीमध्येदेखील आवश्यकतेनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे, अशी ग्वाही शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत उर्वरित २८० मीटर लांबीच्या बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मागणी केल्याप्रमाणे पुढील कामाच्या टप्प्याबाबतही शासनाकडून विचार झालेला नाही. यामुळे मिठमुंबरी बागवाडी या गावाची समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.
शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च करून दोन टप्प्यांमध्ये सात वर्षापूर्वी व त्यानंतर पुन्हा पाच वर्षापूर्वी अशी एकूण २१ हजार सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे काही वर्षांपूर्वी लागवड केलेल्या व वाढलेल्या झाडांची पडझड होऊ नये यासाठीही उर्वरित २८० मीटर व त्यापुढील बोंडगीनपर्यंतचे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी केली होती.
या कपात सूचनेला उत्तर देताना राणे यांनी उर्वरित १२०० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे काम चालू आर्थिक वर्षात समाविष्ट करण्यात आले असून निधी उपलब्ध होताच हाती घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मिठमुंबरी बागवाडी हा धूपप्रतिबंधक बंधारा श्रीवर्धनच्या धर्तीवर बांधण्यात यावा, अशी मागणी जनतेमधून होत आहे. (वार्ताहर)