‘स्वरमिलाप’ होडावडेवासीयांसाठी यादगार
By Admin | Updated: November 25, 2014 23:47 IST2014-11-25T22:36:45+5:302014-11-25T23:47:43+5:30
युवा प्रतिष्ठानचे आयोजन : अभंग, नाट्यगीतांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

‘स्वरमिलाप’ होडावडेवासीयांसाठी यादगार
रामचंद्र कुडाळकर - तळवडे =अभंगातील भक्तीरस, भावगीतातील भावुकता आणि नाट्यगीतातील अनोखा स्वरसाज अशा त्रिवेणी संगमात युवा प्रतिष्ठान, वेंगुर्ले यांनी आयोजित केलेला ‘स्वरमिलाप’ कार्यक्रम होडावडेवासीय व पंचक्रोशीतील रसिक वर्गाकरिता यादगार ठरला.
होडावडे येथे मळेवाड येथील संगीत विशारद सुनील गोवेकर यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आरवली येथील गायक भास्कर मेस्त्री, मळगाव येथील वर्षा देवण या तिघांनीही सुमधुर गाणी सादर केली. सुरुवात गायक सुनील गोवेकर यांनी गायिलेल्या ‘आधी आधी मन’ या अभंगाने केली. त्यानंतर वर्षा देवण यांनी ‘गणपती गणराज’ व नंतर भास्कर मेस्त्री यांनी ‘गुरुचरण..’ हा अभंग सादर केला. त्यानंतर सुनील गोवेकर यांनी ‘ध्यान लागले रामाचे’ हा रामदासांचा अभंग, ‘कधीतरी कोठेतरी’ या नाटकातील छेडून गेले मधुर स्वर... हे नाट्यगीत सादर केली. वर्षा देवण हिने पद्मनाभा नारायणा..., एकला नयनाला... ही नाट्यगीते आपल्या सुरेल आवाजात सादर केली. तर भास्कर मेस्त्री यांनीही नाट्यगीते व भावगीते सादर केली. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या कार्यक्रमात अनेक गाणी सादर करण्यात आली. या सांगितीक कार्यक्रमाची सांगता सुनील गोवेकर व भास्कर मेस्त्री यांच्या ‘सजल नयन...’ या भैरवीने झाली. या कार्यक्रमासाठी हार्मोनियम साथ जिल्ह्यातील प्रसिद्ध हार्मोनियमवादक गजानन मेस्त्री, मृदुंगमणीवादक नेहल कांडरकर, तबलावादक अक्षय सरवणकर, हनुमंत सरवणकर यांनी केली. तर कार्यक्रमाचे निवेदन युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र मातोंडकर यांनी केले. कार्यक्रमाचा शुभारंभ वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा प्रतिष्ठानचे महेश नाईक, अध्यक्ष महेंद्र मातोंडकर, सचिव रामचंद्र कुडाळकर, कोषाध्यक्ष मंगेश माणगावकर, उपाध्यक्ष कृष्णा आमडोसकर, सुनील आजगावकर तसेच तात्या मेस्त्री, उमेश पावणोजी, अरुण घोगळे, चंदू होडावडे, काका सावंत, भाऊ दळवी उपस्थित होते.