महाआॅनलाईनचा संशयास्पद कारभार

By Admin | Updated: November 19, 2014 23:13 IST2014-11-19T21:39:31+5:302014-11-19T23:13:22+5:30

कमलताई परुळेकर : दिशाभूल करु नये

Suspicious operation of Mahanline | महाआॅनलाईनचा संशयास्पद कारभार

महाआॅनलाईनचा संशयास्पद कारभार

सिंधुदुर्गनगरी : महाआॅनलाईनचे विभागीय गटसमन्वयक सुयोग दीक्षित हे वृत्तपत्रांना खोटी माहिती पुरवून दिशाभूल करीत आहेत. त्यांच्याकडून दरमहा मानधन आणि लुबाडणूक केली जात नसेल तर संगणक परिचालकांना आंदोलन करावे का लागले? असा प्रश्न संगणक परिचालक संघटनेच्या नेत्या कमलताई परूळेकर यांनी केला आहे. तर परिचालकांना मिळणाऱ्या ८ हजारपैकी ५० टक्के रक्कम जाते कुठे? ते जाहीर करावे, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकातून केले आहे.
राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यभर महाआॅनलाईनच्या संशयास्पद कारभाराविरोधात आणि विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५० संगणक परिचर या आंदोलनात उतरले आहे. गेले दोन दिवस जिल्हा परिषद भवनासमोर त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील संग्राम कक्षाचे काम पूर्णपणे ठप्प झाल्यानंतर महाआॅनलाईनचे कोकण विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी संगणक परिचालकांना दरमहा नियमित ४१०० मानधन दिले जाते. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी मिळणाऱ्या ८००० रूपयातून मानधनासह छपाई साहित्य, देखभाल दुरूस्ती यासह सर्वच खर्च समाविष्ट असल्याचे सांगितले होते. तसेच कोणत्याही प्रकारे संगणक परिचालकांची पिळवणूक केली जात नसल्याचे स्पष्ट केले होते.
याबाबत मंगळवारी कमलताई परूळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुयोग दीक्षित हे वृत्तपत्रांना खोटी माहिती पुरवून दिशाभूल करीत आहेत. दरमहा मानधन मिळत असेल, अन्याय होत नसेल तर आंदोलने कशासाठी करायची? गेले तीन वर्षे प्रत्येक डाटा आॅपरेटरसाठी मिळणाऱ्या ८००० रूपयांपैकी ५० टक्केहून जादा पैसे कुठे जातात? याचा शोध घेत आहोत. हे पैसे कुठे खर्च केले जातात? या खर्चाचा ताळेबंद त्यांनी द्यावा. काहींना ३५०० तर काहींना ३८०० रूपये मानधन प्रत्यक्ष दिले जात असताना दरमहा ४१०० देतो, असे सांगणे खोटे आहे. तसेच तीन-तीन महिने वेतन दिले जात नसताना दरमहा नियमित मानधन दिले जात असल्याचे खोटे सांगत आहेत. मिळणाऱ्या ८००० रूपयांतून ५० टक्के रक्कम सुमारे ४००० रूपये कशावर खर्च होतात? दरमहा देखभाल दुरूस्तीवर खर्च येत नाही. छपाई साहित्य २०० ते ३०० रूपयांना मिळते, मग एवढे पैसे जातात कुठे? हा आमचा प्रश्न आहे.
महाआॅनलाईन कंपनी ५० टक्केपेक्षा जास्त रक्कम कशासाठी खर्च करते हे गेल्या तीन वर्षाचा जमा-खर्चाचा ताळेबंद दीक्षित यांनी जाहीर करावा. तसेच प्रवास खर्च, बैठक भत्ता देण्याचे शासन आदेशात नमूद केले असताना ते पैसे कोण हडप करतो? हे दीक्षित यांनी सांगावे. (प्रतिनिधी)

सत्य समोर आणावेच लागेल
कोणत्या बाबीवर किती खर्च केला जातो? याचा ताळेबंद जाहीर करावा. केवळ वृत्तपत्रांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार करू नये. सत्य समोर आणावेच लागेल, असा इशारा कमलताई परूळेकर यांनी दिला आहे.

Web Title: Suspicious operation of Mahanline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.