दोडामार्ग : पेशाने वैद्यकीय अधिकारी असलेल्या खोक्रल येथील शिवप्रसाद कृष्णा गवस (वय २५) या युवकाचा मृतदेह मंगळवारी संशयास्पदरीत्या पणजी येथील मांडवी नदीत पोर्ट जेटीनजीक सापडला. मृतदेहावर छातीकडे मोठ्या प्रमाणात रक्त लागले होते. तर तोंडात एकही दात नव्हता. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रेमप्रकरणातूनच हा सारा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, अधिक तपास पणजी येथील पोलीस करीत आहेत. शिवप्रसाद गवस हा खोक्रल येथील युवक गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. नातेवाइकांनी शोधाशोध केली असता त्याची पल्सर गाडी, हेल्मेट व मोबाईल पणजी येथील मांडवी नदीवरील पुलावर आढळला होता. त्यामुळे प्रथमदर्शनी त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानंतर सतत तीन दिवस त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता. अखेर मंगळवारी पोर्ट जेटीनजीक त्याचा मृतदेह सापडला. यावेळी शरीरावर जखमा असल्याचे दिसून आले. तर छातीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग साचल्याचे दिसत होते. शिवाय तोंडात एकही दात शिल्लक नव्हता. त्यामुळे मृत शिवप्रसाद याने आत्महत्या केली नाही, तर त्याचा घातपात झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. (प्रतिनिधी)शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारदरम्यान, हा सारा प्रकार पे्रेमप्रकरणातून घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शिवप्रसाद याचे एका मुलीवर पे्रेम होते. त्याने मुलीच्या घरी मागणीदेखील घातली होती. मात्र, मुलीच्या नातेवाइकांनी नकार दर्शविला होता. मुलीच्या बहिणीच्या नवऱ्याने शिवप्रसाद याला मारण्याची धमकीदेखील दिली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी हा प्रकार घडला. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. शिवप्रसाद गवस याचे पार्थिव मंगळवारी खोक्रल येथे आल्यावर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खोक्रल येथील युवकाचा संशयास्पदरीत्या मृत्यू
By admin | Updated: February 18, 2015 23:58 IST