गुणवत्तेसाठी सहकारी संस्थांचे सर्वेक्षण
By Admin | Updated: July 2, 2015 22:50 IST2015-07-02T22:50:48+5:302015-07-02T22:50:48+5:30
सहकार नियम : अकार्यक्षम संस्थांची नोंदणी होणार रद्द

गुणवत्तेसाठी सहकारी संस्थांचे सर्वेक्षण
रत्नागिरी : सहकार क्षेत्राच्या गुणात्मक वाढीसाठी सहकार विभागाने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत राज्यभर सहकारी संस्थांची महत्त्वाकांक्षी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या सर्वेक्षणात अकार्यक्षम आढळणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.ही मोहीम जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. मोहिमेंतर्गत प्रशासन व लेखा परीक्षण विभागातील कर्मचारी संस्थेच्या नोंदणीकृत पत्त्यावर समक्ष भेट देऊन संस्थेची पडताळणी करणार आहेत. ३१ मार्च २०१५ अखेर रत्नागिरी जिल्ह्यात नोंदणीकृत संस्था २४४०, प्राथमिक कृषी पतसंस्था ३६७, नागरी व ग्रामीण बिगरशेती पतसंस्था ३१८, प्रक्रिया संस्था २६, गृहनिर्माण संस्था १०२० अशा एकूण ४ हजार १७१ सहकारी संस्था आहेत.
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या १७ जून २०१५ च्या परिपत्रकान्वये सर्व सहकारी संस्थांची पाहणी करुन केवळ नावाला कागदोपत्री असलेल्या, बंद, कार्यस्थगित सहकारी संस्था अवसायनात घेऊन नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची पडताळणी सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी करणार आहेत. ज्या संस्थांनी कामकाज सुरु केलेले नाही, कामकाज करण्याचे बंद केले आहे, ज्यांचे भागभांडवल ५०० रूपयांपेक्षा कमी आहे अथवा सहकार कायद्यानुसार आवश्यक विवरणपत्र निबंधकांकडे सादर केलेली नाहीत, अशा संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सहकारी संस्थांचे पदाधिकारी व पडताळणी करणारे कर्मचारी यांची भेट न झाल्यास, संस्थेसंबंधी व्यक्ती आढळून न आल्यास अगर नोंदणीकृत पत्त्यावर संस्था आढळून न आल्यास संस्थेची नोंदणी रद्द करणेबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याने संस्थांनी तालुका सहाय्य्क निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक राजेंद्र महाजन यांनी केले आहे. (प्रतिनिधी)