पाणी नसल्याने राजापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियाच स्थगित
By Admin | Updated: May 21, 2015 00:01 IST2015-05-20T22:49:56+5:302015-05-21T00:01:37+5:30
४५ मुलांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

पाणी नसल्याने राजापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियाच स्थगित
राजापूर : शहरातील महत्त्वपूर्ण अशा ग्रामीण रुग्णालयाला पंचायत समितीने पाणी पुरवठा करायचा की, नगर परिषद प्रशासनाने, हा वाद सुरू झाल्याने समस्त आरोग्य यंत्रणेसह रुग्णांना विविध प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या वादामुळे रुग्णालयातील ४५ मुलांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
एक महिन्यापूर्वीच राजापूर ग्रामीण रुग्णालयाने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राजापूर पंचायत समितीकडे पाणीपुरवठा करण्याबाबत लेखी स्वरुपात मागणी केली होती. एवढ्या कालखंडात या रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यात पंचायत समितीने दिरंगाई दाखवली, तर दुसरीकडे राजापूर नगर परिषद प्रशासनादेखील त्या रुणालयाला पाणी पुरवठा केलेला नाही.
या दोन प्रशासनाच्या वादात कडाक्याच्या उन्हाळ्यात रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेसह विविध आजारांसाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची पाण्याअभावी त्रेधातिरपीट उडाली आहे. मागील काही दिवस रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मागणीनुसार खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी दरदिवशी रुग्णालयाला लागणारे पाणी लक्षात घेता तेवढा पुरवठा होत नसल्याने अंतर्गत उपचार पद्धतीला अडथळा ठरत आहे.
या रुग्णालयात हार्निया, हायट्रोसिस, फायमोसिस अशा आजारांनी त्रस्त असलेल्या ४५ शालेय विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार होत्या. शालेय आरोग्य तपासणी मोहिमेत एकूण ७५ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया होणार होत्या. यापूर्वी ३० विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. उर्वरित शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयाने तयारी सुरू केली होती मात्र पाणीटंचाई आड आली.
शस्त्रक्रियेदरम्यान आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने त्या पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता जेव्हा मुबलक पाणी उपलब्ध होईल त्यानंतरच शस्त्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
पंचायत समिती व नगर परिषद प्रशासन यापैकी राजापूर ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करायला कोणीच तयार नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. एवढे असूनही आमच्या लोकप्रतिनिधींना त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याची स्थिती खेदजनक आहे.
निदान आता तरी राजापूर ग्रामीण रुग्णालयाला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल का, हाच खरा प्रश्न आहे.
राजापूर ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरुपी पाणी पुरवठा व्हावा, यासाठी एखादी पाणी योजना राबवण्याबाबतचा निर्णय सुमारे १० वर्षांपूर्वी झाला होता. भटाळीलगत नदीपात्रात विहीर खोदून त्याद्वारे रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, नंतर पुढे काहीच हालचाल न झाल्याने मागील दशकाच्या कालखंडात या रुग्णालयाला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसून, पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागतेय. (प्रतिनिधी)
ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा कोणी करायचा, या वादात पाणी-पुरवठाच होत नाही.
आतापर्यंत पंचायत समितीने पाणीपुरवठा करण्यात दिरंगाई दाखवल्याने टंचाई कायम आहे.
आपली जबाबदारी नसल्याचे सांगून नगर परिषदेने हात झटकले आहेत. यामध्ये रुग्णांचे हाल होत आहेत.