सुरेश प्रभू यांचा होणार नागरी सत्कार

By Admin | Updated: December 29, 2014 00:02 IST2014-12-28T22:32:13+5:302014-12-29T00:02:20+5:30

कोकण रेल्वेच्या प्रश्नांवरही प्रभू यांच्या या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Suresh Prabhu will be honored in civil hospitality | सुरेश प्रभू यांचा होणार नागरी सत्कार

सुरेश प्रभू यांचा होणार नागरी सत्कार

रत्नागिरी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा ४ जानेवारी २०१५ रोजी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता रत्नागिरीकरांतर्फे नागरी सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी आज (रविवार) येथील नगरवाचनालयात झालेल्या मान्यवरांच्या बैठकीत नगरवाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ‘मंत्री सुरेश प्रभू नागरी सत्कार समिती’ स्थापन करण्यात आली आहे.प्रभू हे केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. नद्याजोड कार्यक्रमावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुरेश प्रभू यांना मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.या पदावर येताच प्रभू यांनी कोकणवासियांच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या कोकण रेल्वेच्या समस्या सोडविण्यावर प्रामुख्याने लक्ष दिले आहे. कोकणवासियांचे कोकण रेल्वेबाबत अनेक प्रश्न, समस्या असून प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने कोकणवासियांच्या समस्या सुटण्याबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मंत्री झाल्यानंतर प्रभू हे येत्या ४ जानेवारी २०१५ रोजी प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. यादिवशी सावरकर नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता हा सत्काराचा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी समितीने जय्यत तयारी सुरू केली आहे. कोकण रेल्वेच्या प्रश्नांवरही प्रभू यांच्या या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, स्थानिक रेल्वेगाड्यांची संख्या वाढवणे आदी विषयांवरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुरेश प्रभू हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यातच प्रभू यांनी आता शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्याने स्थानिक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या या नागरी सोहळ्याला येणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Suresh Prabhu will be honored in civil hospitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.