सुरेश प्रभू कोकणचा सन्मान
By Admin | Updated: November 10, 2014 23:54 IST2014-11-10T23:24:49+5:302014-11-10T23:54:19+5:30
निश्चितच राखतील : उपरकर

सुरेश प्रभू कोकणचा सन्मान
कणकवली : बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारखेच सुरेश प्रभू हे हुशार व्यक्तिमत्त्व आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना त्यांचे महत्त्व समजले नाही, अशी टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू यांच्या बुद्धीमत्तेचा कस ओळखून केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लावली आहे. आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून ते कोकणचा सन्मान निश्चितच राखतील, असा विश्वास मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला.
येथील संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपरकर म्हणाले, सुरेश प्रभू हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र असून एक चांगले प्रशासकही आहेत. त्यामुळेच केंद्रीय रेल्वे मंत्रीपदी त्यांची नियुक्ती पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
कोकणाबरोबरच देशासाठी ते चांगले काम करू शकतात, हे त्यांच्या मागील राजकीय कारकिर्दीतून दिसून आले आहे. सुरेश प्रभूंचे कार्य जनतेला कळायला पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. कारण दूरदृष्टी ठेवून ते निर्णय घेत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरध्वनी सेवा, विद्युतीकरण, बचतगटांच्या माध्यमातून महिलांबरोबरच पुरूषांचाही विकास साधणे असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर ज्या गाड्या थांबत नाहीत त्या गाड्यांना थांबा मिळविण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. तसेच रेल्वेसंबंधीचे प्रलंबित प्रश्नही ते सोडवतील. माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांच्यानंतर कोकणातील दुसरे रेल्वे मंत्री म्हणून भारताच्या नकाशावर सुरेश प्रभू यांचे नाव आता झळकणार आहे. त्यामुळेच पक्षभेद विसरून त्यांचे मनसेच्यावतीने आम्ही अभिनंदन करीत आहोत. (वार्ताहर)
क्षमता ओळखून
मोदींनी संधी दिली
खासदार नसतानाही त्यांची क्षमता ओळखून मोदी शासनाने त्यांना मंत्रीपदी संधी दिली आहे. त्यांच्याबरोबर दूरध्वनीवर संपर्क केला असता ‘मला कोकणसाठी काहीतरी करायचे आहे. त्यादृष्टीने माझे निश्चितच प्रयत्न राहणार आहेत’ असे अभिवचन प्रभू यांनी दिले असल्याचेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.