तृष्णा भागविणारी ‘सुरभी’ जनावरांसाठी पाणवठा : ओटवणेतील उपक्रम आदर्शवत
By Admin | Updated: May 12, 2014 00:12 IST2014-05-12T00:12:13+5:302014-05-12T00:12:13+5:30
महेश चव्हाण ल्ल ओटवणे उन्हाळा आला की नदीनाले, विहिरी कोरड्या पडू लागतात. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आणि माणसांसह मुक्या

तृष्णा भागविणारी ‘सुरभी’ जनावरांसाठी पाणवठा : ओटवणेतील उपक्रम आदर्शवत
महेश चव्हाण ल्ल ओटवणे उन्हाळा आला की नदीनाले, विहिरी कोरड्या पडू लागतात. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आणि माणसांसह मुक्या जनावरांनाही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहावी लागते. ओटवणे गावही याला अपवाद नाही. परंतु ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरचे संस्थापक शिक्षणमहर्षी कै. काका दामले यांनी विद्यामंदिरानजिक बांधणी केलेल्या ‘सुरभी’ या पाणपोईपासून प्रेरणा घेऊन तसे उपक्रम राबविल्यास ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील जनावरांचे होणारे हाल निश्चितच थांबणार आहेत. सूर्याच्या तप्त किरणांच्या उष्णतेने येथील सर्व प्राणीमात्रांसह मानवाची सुध्दा लाही लाही होत आहे. नदीनाले, खोल विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. मुक्या जनावरांना चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहावी लागत आहे. याला जबाबदार सर्वस्वी बेसुमार वृक्षतोड करणारा माणूसच आहे. त्याच्या या अविचारी कृत्यामुळे त्याच्याबरोबरच गुरे आणि अन्य मुक्या जनावरांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. यामुळे माणसाला पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात बुध्दीमान प्राणी असणार्या माणसालाही पाणी टंचाईची समस्या सोडविताना अनेक खटाटोप करावे लागतात. मग मुक्या प्राण्यांचा कसा निभाव लागेल? माणूस माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. परंतु मुक्या जनावरांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करणारी माणसे दुर्मीळच. श्री रवळनाथ मंदिरचे संस्थापक कै. काका दामले हे यातीलच एक व्यक्तिमत्व. उन्हाळ्याच्या दिवसात नदीनाले, विहिरी सुकून गेल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागते. तृष्णा शांत करण्यासाठी जनावरांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी त्यांनी रस्त्याच्या बाजूला सुरभी या पाणपोईची बांधणी केली आहे. माणसासाठी कुलर अथवा तत्सम पाण्याची सोय केली जाते. परंतु जनावरांच्या पाण्याच्या सोयीची समस्या कोणापर्यंत पोहोचली नव्हती. या भावनेच्या पलिकडचा ठाव कै. काका दामले यांनी घेत गुरांसाठी, पक्ष्यांसाठी पाणपोई बांधली आहे. चरायला गेलेली गुरे उन्हातून घरी परतताना या पाणपोईवर निवांतपणे पाणी पिऊन पुढे मार्गस्थ होतात. आकाशात चहुबाजूंनी घिरट्या घालणारे पक्षीही ‘सुरभी’च्या पाण्याने जीव शांत करतात.