लंडनमध्ये जपल्या जाताहेत सुवर्णदुर्गच्या स्मृती!
By Admin | Updated: February 19, 2016 00:20 IST2016-02-18T23:56:08+5:302016-02-19T00:20:24+5:30
सेवेनद्रुग कॅसल : वारसाहक्क श्रेणीत मांडल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या इमारतींमध्ये समावेश

लंडनमध्ये जपल्या जाताहेत सुवर्णदुर्गच्या स्मृती!
दापोली : सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याने मोहीत झालेल्या हर्णैजवळील सुवर्णदुर्ग किल्ल्याची स्मृती आजही लंडन येथे जपली जात आहे. इंग्लंडमधील वारसाहक्क श्रेणीत मांडल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या २१ इमारतींमध्ये सेवेनद्रुग कॅसलने स्थान मिळवले आहे.हर्णैजवळील पाण्यामध्ये असलेल्या सुवर्णदुर्ग शिवाजी महाराजांनी हा दुर्ग १६६०मध्ये आदिलशहाकडून जिंकला आणि १८१८पर्यंत हा सुवर्णदुर्ग स्वराज्यातच राहिला. त्यानंतर सिद्धीने सदरचा दुर्ग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरखेल कान्होजी आंग्रेनी हाणून पाडला. त्यानंतर मात्र पेशव्यांनी ब्रिटिशांशी हात मिळवणी करत सुवर्णदुर्गवर चढाई केली व आतील सर्व लूट करून इंग्रजांनी तो किल्ला पेशव्यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पुन्हा दुर्ग ब्रिटिशांच्या कारकिर्दीत चर्चेत आला. त्याला कारण होते सर विल्यम जेम्स! वयाच्या १८व्या वर्षी जेम्स एक जहाज घेऊन वेस्टइंडिजला जात असताना सागरी मोहिमेत स्पॅनिश लोकांनी त्याला पकडले आणि शिक्षा म्हणून पुन्हा समुद्रात सोडले. त्यानंतर जेम्सने १७४७ साली ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी धरली. व्यापारी जहाजाच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. त्याकाळी समुद्रात असणारे चाचे मालवाहू बोटींची लूट करत असत. या चाच्यांना रोखण्याचे प्रयत्न अनेकांनी करुन पाहिले. पण, यात कोणीच यशस्वी झाले नव्हते. याची महत्त्वाची जबाबदारी जेम्सने स्वीकारली आणि त्याने बॉम्बे प्लीट नावाची तुकडी भारताच्या किनारपट्टीवर उभी केली.
तब्बल ४८ तोफा असलेले प्रोटेक्टर नावाचे जहाज सोबत घेतले आणि समुद्री चाच्यांचा पाडाव करायला जेम्स सज्ज झाला. कोकण किनारपट्टीवर तुळाजी आंग्रे यांच्या तुकडीचा त्यात समावेश होता. हर्णैजवळ असणाऱ्या सुवर्णदुर्गच्या आश्रयाने मराठ्यांची ही तुकडी इस्ट इंडिया कंपनीच्या मालवाहू जहाजांना लक्ष करुन लूट करत असे. या गोष्टीचा बिमोड करण्यासाठी जेम्सने थेट सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला व आपले नाविक दल, तोफखाना यांचा पुरेपूर वापर करत १७५५ साली जेम्सने सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला.
१७५९मध्ये जेम्स इंग्लंडला परतला तेव्हा तो एक गर्भश्रीमंत म्हणून! आपली पत्नी अॅन गोगार्ड आणि दोन मुलांसह तो सोळा परागण्यातल्या गेराड स्ट्रीटवर राहात असे. लंडनमधील वास्तव्यात जेम्स सुवर्णदुर्गला मात्र विसरला नव्हता. १७८३मध्ये जेम्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि या किल्ल्यात राहायचे त्याचे स्वप्न अपुरे राहिले. आपल्या पतीची स्मृती जतन करण्यासाठी जेम्सच्या पत्नीने लंडनमध्ये सेवेनद्रुग कॅसल नावाची इमारत उभारली. (प्रतिनिधी)
जेम्सच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर १८१६मध्ये लंडनचा माजी शेरीफ जॉन कोडसनने ते किल्लेवजा स्मारक विकत घेतले. त्यानंतर तब्बल दोन दशके ते बांधकाम हस्तांतरीत होत राहिले. मात्र, १९८६पर्यंत जगभरातील पर्यटकांसाठी खुले असणारे हे सेवनद्रुग कॅसल नंतर बंद करण्यात आले.