...तर महायुतीची गाडी पळणार सुपरफास्ट--रत्नागिरी शिवसेनेला फायदा मिळणार
By Admin | Updated: September 25, 2014 00:23 IST2014-09-24T22:42:41+5:302014-09-25T00:23:18+5:30
राजापुरात दोन्ही काँग्रेसचे नुकसानच!

...तर महायुतीची गाडी पळणार सुपरफास्ट--रत्नागिरी शिवसेनेला फायदा मिळणार
चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर महायुतीचा मार्ग सहज सोपा होईल आणि महायुतीची गाडी सुपरफास्ट धावेल.
चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदार संघात महायुतीतर्फे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची उमेदवारी नक्की मानली जाते. ते उद्या दि. २५ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. चव्हाण यांनी पाच वर्षात केलेली विकासकामे, मतदारसंघात सातत्याने ठेवलेला संपर्क, सर्वांशी सौदार्हपूर्ण ठेवलेला व्यवहार यामुळे ते अजातशत्रू म्हणून गणले जातात. या मतदार संघातील देवरुख नगरपंचायत, जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे सदस्य शिवसेनेचे आहेत. चिपळूण शहरातही सेनेला मानणारे कार्यकर्ते आहेत. एकूणच मतदारसंघात आमदार चव्हाण यांचा प्रभाव आहे. आघाडी न करता राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढल्यास आमदार चव्हाण यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही.
आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व संभाव्य उमेदवार शेखर निकम अधिक अडचणीत येतील. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या रश्मी कदम, संदीप सावंत, अशोक जाधव यांची नावे चर्चेत आहेत. या तिघांनीही उमेदवारी अर्ज घेतले आहेत. आघाडी तुटली तर या तिघांपैकी एक उमेदवार निकम यांच्यासमोर उभा राहील. त्यामुळे आघाडीच्या मतांचे विभाजन होईल. मुळात आघाडीला एक एक मतासाठी झुंजावे लागत आहे.
जिल्हाध्यक्ष निकम आपल्या वैयक्तिक करिष्म्यावर व वडिलांच्या पुण्याईवर या मतदार संघात एकाकी झुंजत आहेत. अशा स्थितीत आघाडी तुटली तर निकम यांची वाट अधिक काट्याची होईल. याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल. या मतदार संघात मनसेतर्फे संतोष नलावडे रिंगणात आहेत. मनसेची मते शिवसेनेकडे वळण्याऐवजी ती जागेवर थांबतील. तरीही महायुतीचा फायदाच होणार आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी शिवसेनेला फायदा मिळणार
रत्नागिरी : महायुती होताना सेना-भाजपामध्ये जे काही नाट्य घडले, तणातणी झाली, त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासूनच्या या युतीचे अंगअंग शहारले. टोकापर्यंत ताणली गेलेली युती कशीबशी तरताना दिसत असतानाच त्यापेक्षा भयावह स्थिती कॉँग्रेसची आघाडी होताना झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आघाडी झाली नाही तर त्याचा फटका जिल्ह्यातील राष्ट्रवादीला अधिक बसणार आहे. कॉँग्रेसचे जिल्ह्यातील वर्चस्व नगण्य आहे. अगदी आघाडी झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत खरा सामना हा शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांतच होणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात युतीचे वर्चस्व मोठे आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे उदय सामंत यांनी बाजी मारली. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता येथे पंचायत समितीवर गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. सेनेचा सभापती आहे.
तालुक्यातील ९४ पैकी ६८ ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत. कुवारबावसारखी राष्ट्रवादीकडे असलेली मोठी ग्रामपंचायतही सेनेने काबीज केली आहे. त्यामुळे तालुक्यात व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सेनेचे वर्चस्व आहे. मात्र, हा मतदारसंघ युतीमुळे भाजपाच्या वाट्याला आला आहे. यावेळी कॉँग्रेसची आघाडी झाली नाही, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळणारी कॉँग्रेसची मते कमी होणार आहेत. त्याचा फटका येथील आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.
राज्यात आघाडीचे घोेडे जागावाटपावरून अडले आहे. त्यातच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला हवे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. त्यामुळे युतीप्रमाणेच आघाडीतही टोकाचे ताणतणाव आहेत. स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर आघाडी बिघडली तर जिल्ह्यात रत्नागिरी व गुहागर या राष्ट्रवादीच्या जागांना फटका बसू शकतो. राजापूर व दापोली हे दोन मतदारसंघ आघाडीतील घटक पक्ष कॉँग्रेसकडे आहेत. या दोन्ही मतदारसंघात कॉँग्रेसला आघाडी झाली तरीही फारशी संधी नाही. त्यातच आघाडी झाली नाही तर कॉँग्रेसची स्थिती या दोन्ही मतदारसंघात बिकट होणार आहे. निवडणुकीला अवघे २० दिवस शिल्लक असताना युती व आघाडीचाही पत्ता नाही. वादंगामुळे चर्चेच्या फेऱ्या, बैठका सुरूच आहेत. निर्णय मात्र काहीच होत नाही. या स्थितीत युती व आघाडी तुटलीच तर शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात खरी लढत होईल. (प्रतिनिधी)
राजापुरात दोन्ही काँग्रेसचे नुकसानच!
राजापूर : सन्मानजनक जागांचा तिढा न सुटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही फुटीच्या उंबरठ्यावर असून, राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात त्याचे जोरदार परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतील.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात राजापूरवगळता उर्वरित तालुक्यात राष्ट्रवादीने उत्तुंग भरारी घेतली होती. मात्र, अलीकडच्या काळता राष्ट्रवादीला राजापुरात दिवंगत शांताराम मठकर यांचे समर्थ नेतृत्व लाभले. त्यामुळे मागील चार-पाच वर्षात राजापूरसह लगतचा लांजा तालुका व साखरपा या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसच्या खालोखाल त्यांची वाटचाल सुरु असून, या निवडणुकीत आघाडी न झाल्यास मतविभाजनाचा तोटा दोन्ही काँग्रेसला सहन करावा लागणार आहे.
अनेक निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसचे काम न करता आतून सेनेला सहकार्य करतात, असा नेहमीच आरोप काँग्रेसकडून होत आहे. आघाडी संपुष्टात येऊन दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे लढत दिली, तर मग राष्ट्रवादी व काँग्रेसमधून एकमेकांकडे संशयाने पाहण्याची गरजच भासणार नाही. कारण त्यांचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा युतीला होणार हे निश्चित आहे.
मतदारसंघात केवळ राजापुरातच आघाडीला चांगले स्थान आहे. जिल्हा परिषदेत प्रत्येकी एकेक सदस्य आहेत. पंचायत समितीमध्ये चार काँग्रेस, तर दोन राष्ेट्रवादीचे सदस्य आहेत. राजापूर नगर परिषदेमध्ये दहा काँग्रेस व दोन राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. काही ग्रामपंचायती दोन्ही पक्षांकडे आहे. मात्र, लगतच्या लांजा तालुक्यात व साखरपा विभागात आघाडीची पाटी कोरी आहे. दोन्ही पक्षांची ताकद बऱ्यापैकी आहे. परिणाम आघाडीवर परिणाम झाल्यास विजयावर पाणी सोडावे लागेल. आघाडी झाली व दोन्ही काँग्रेसने मन लावून दिलेल्या उमेदवाराचे काम केले, तर चमत्कार करण्याएवढी ताकद आघाडीमध्ये आहे. मात्र, कोणता निर्णय होतो, त्यावरच उभय काँग्रेसचे यशापयश अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)