कोकणात काजू पिकासाठी सुयोग्य स्थिती
By Admin | Updated: November 28, 2014 23:52 IST2014-11-28T22:13:59+5:302014-11-28T23:52:47+5:30
व्यंकटेश हुबळी : वेंगुर्लेत राज्यस्तरीय काजूपीक कार्यशाळा

कोकणात काजू पिकासाठी सुयोग्य स्थिती
वेंगुर्ले : कोकणात काजू लावगडीसाठी योग्य जमीन आहे. एक हेक्टरला ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात काजू पीक घ्यावे, असे आवाहन व्यंकटेश हुबळी यांनी वेंगुर्ले येथे केले. यावेळी काजू पीक कार्यशाळेचे औचित्य साधून काजू लागवड तंत्रज्ञान या शेतकऱ्यांना उपयुक्त अशा पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
काजू व कोको विकास संचालनालय, कोची आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे राज्यस्तरीय काजू पीक कार्यशाळेचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन कोची येथील काजू व कोको विकास संचालनालयाचे संचालक कोची येथील व्यंकटेश हुबळी यांच्या हस्ते झाले.
शेतकऱ्यांना काजू पिकाला लागणारी किडे, खते व अन्य समस्यांबाबत माहिती व्हावी, यासाठी या राज्यस्तरीय काजू पीक लागवडीसाठी आयोजन केले होते. यावेळी प्रास्ताविकात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्लेचे संचालक डॉ. बी. आर. साळवी यांनी काजू लागवडीच्या क्षेत्राबाबत व उत्पादनाबाबत माहिती सांगून व्हिएतनाममध्ये व वेंगुर्ले तालुक्यात काजूचे उत्पादन घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून शेती करावी. पाणी व खत याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास चांगल्याप्रकारे काजू पीक घेता येईल, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर यांनी केले. यावेळी हुबळी यांचा डॉ. बी. आर. साळवी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, डॉ. बी. एन. सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. बी. एन. सावंत यांनी मानले. मृदशास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. साळवी यांनी काजू खते व्यवस्थापन, किटकशास्त्रज्ञ व्ही. के. झोटे यांनी काजूवरील ढोकण्या व इतर महत्त्वाच्या किडी व त्यांची नियंत्रण, ए. वाय. मुंज यांनी काजूवरील खोड व मूळ पोखरणारी कीड व त्यांचे नियंत्रण, वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांनी काजूवरील रोग व त्यांचे नियंत्रण आदींवर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. (प्रतिनिधी).
शेतकऱ्यांची पाठ
राज्यस्तरीय काजू पीक कार्यशाळेला राज्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. जिल्ह्यातीलही मोजकेच शेतकरी उपस्थित होते. केंद्रातीलच कर्मचाऱ्यांची उपस्थिती जास्त होती.