रेल्वेट्रॅक बनतोय ‘सुसाईड पॉर्इंट’

By Admin | Updated: April 23, 2015 00:37 IST2015-04-22T22:55:01+5:302015-04-23T00:37:56+5:30

नागरिकांची दक्षता : अज्ञात मद्यधुंद युवतीची आत्महत्या टळली

'Suicide Point' by making a railwayweight | रेल्वेट्रॅक बनतोय ‘सुसाईड पॉर्इंट’

रेल्वेट्रॅक बनतोय ‘सुसाईड पॉर्इंट’

सागर पाटील-टेंभ्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ असणारा साईनगर येथील रेल्वे ट्रॅक दिवसेंदिवस ‘सुसाईड पॉर्इंट’ म्हणून कुप्रसिद्ध होत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. एक अज्ञात युवती या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी आली असता येथील नागरिकांच्या जागरुकतेमुळे या युवतीला आत्महत्येपासून परावृत्त करणे शक्य झाले. एकंदरीतच या परिसरात रेल्वे ट्रॅकवर होणाऱ्या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या थांबविण्याच्यादृष्टीने प्रशासनाने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.
परिवहन कार्यालय शेजारुन जाणारा रेल्वे ट्रॅक जमिनीपासून थोडासा उंचावर आहे. परंतु, तेथे सहज चढून जाता येत असल्याने या ट्रॅकवर सतत वर्दळ पाहायला मिळते. लोकवस्तीपासून हा भाग दूर असल्याने आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला सहजासहजी येथे पोहोचता येते. विशेष म्हणजे याठिकाणी एकांत असल्याने काहीजण विरंगुळा म्हणूनही येथे येतात. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी या ट्रॅकशेजारी बसून मद्य प्राशन करणाऱ्यांचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. यामुळे अनेकवेळा मद्यपी बेधुंद होऊन ट्रॅकच्या परिसरात पडलेले आढळतात. त्यामुळे याठिकाणी हकनाक बळी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे.
बऱ्याचवेळा या रुळावर तरुण जोडपी फिरताना दिसतात. यामुळे हा ट्रॅक म्हणजे ‘इव्हिनिंग वॉक’ चे ठिकाणी बनले आहे. या परिसरात मोकाट जनावरांचा वावरही सातत्याने पहायला मिळतो. या परिसरात वारंवार अपघात अथवा आत्महत्या होत असतानाही रेल्वे प्रशासन अथवा जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही. हा ट्रॅक पूर्णत: उघडा असल्याने ट्रॅकवर प्रवेश करणे सहज सोपे होते. ट्रॅकवर होणारे अपघात किंवा आत्महत्या टाळण्यासाठी ज्या ठिकाणी चढून जाणे शक्य आहे. अशा ठिकाणी ट्रॅकला संरक्षक कुुंपण घालणे आवश्यक आहे. यामुळे या ट्रॅकवरील माणसांचा व जनावरांचा वावर थांबविणे शक्य होईल. रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा हे ठिकाण सुसाईड पॉर्इंट म्हणून सर्व परिचित होण्यास वेळ लागणार नाही.
काही दिवसांपूर्वी एका महिलेने केलेला आत्महत्येचा प्रयत्न जागरूक नागकरिकांमुळे वाचला असेल. पण भविष्यात अशा होणाऱ्या प्रयत्नांचं काय? असा सवाल विचारला जात आहे.

मद्यपी तरुणी सरकारी नोकरदार!
या रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या मद्यपी युवतीला या परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिकांनी केलेल्या चौकशीत ही तरुणी सरकारी नोकरदार असल्याचे निष्पन्न झाले. वैफल्यग्रस्त असणारी ही तरुणी मद्यप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी नागरिकांनी तिला वाचवले. अन्यथा एक जीव हकनाक गेला असता. अशा घटना भविष्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


नागरिकांंच्या जागरूकतेमुळे एका युवतीचा प्राण वाचला असेल पण अन्य तरूण-तरूणींचं काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. यावर तोडगा म्हणून याठिकाणी कुंपण घालण्याची मागणी होत आहे.


ट्रॅकभोवती मद्यपींची गर्दी.
ट्रॅकला संरक्षक कुंपणाची आवश्यकता.
परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण.
नागरिकांच्या जागरूकतेमुळे एका युवतीचे प्राण वाचले.
आत्महत्येचा प्रयत्न करणारी युवती मद्यधुंद.
नागरिकांनी तिचा जीव वाचवून तिला दिले पोलिसांच्या ताब्यात.
जीव वाचवणाऱ्या नागरिकांचे कौतुक .

Web Title: 'Suicide Point' by making a railwayweight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.