दुष्काळ परिस्थितीवर हळवे पीक योग्य

By Admin | Updated: July 19, 2015 23:37 IST2015-07-19T22:46:58+5:302015-07-19T23:37:23+5:30

कमी पाऊस : पर्यायी उपायाचा स्वीकार करण्याची गरज

Sufficient crop right on drought conditions | दुष्काळ परिस्थितीवर हळवे पीक योग्य

दुष्काळ परिस्थितीवर हळवे पीक योग्य

शिवाजी गोरे- दापोली -कोकणात दरवर्षी नैसर्गिक बदलाचा परिणाम जाणवतो. कधी काळी कोकणात धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. त्यामुळे भविष्यात कोकणचे मुख्य पीक भात धोक्यात येऊ शकते. नैसर्गिक बदलाला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्याने आता नागली व हळव्या भातपिकाकडे वळण्याची गरज आहे. कारण हळवी भात पिके १०० ते १२० दिवसात तयार होतात. या पिकांना पाऊसही कमी लागतो. त्यामुळे शेतकऱ्याने कमी पावसात कोणती पिके घ्यावीत, याचा प्राधान्याने विचार करायला हवा, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (डायरेक्टर आॅफ रिसर्च सीड) डॉ. ए. के. शिंदे यानी व्यक्त केले.
कोकणात गेली दोन वर्षे ऐन भात लावणीत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची भातलावणीची कामे रखडतात. भात लावणीला उशीर झाल्याने त्याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कमी पावसात कोणती पिके घेता येतील, यावर कृ षी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ संशोधन करीत असून, उशिरा भात लावणी होऊनसुद्धा भातपीक घेण्यासाठी कमी कालावधीतील हळव्या भाताच्या जातीचा पर्याय समोर आला आहे. त्याचप्रमाणे नागली पीकसुद्धा कमी पावसाचा पर्याय म्हणून समोर आले आहे. कमी पावसात उशिरा लावणीसाठी रत्नागिरी - ७३, कर्जत - १८४, रत्ना कर्जत -१, रत्नागिरी - २४, रत्नागिरी - ७११, रत्नागिरी - १, कर्जत - ४ या हळव्या जातीच्या वाणांचा वापर करता येईल. यामुळे उशिरा पेरणी व लावणी करुनसुद्धा फायदा होईल.
नागली पिकाची लागवड वरकस आणी उतार असलेल्या जमिनीत केली जाते. खरीप हंगामात कोकणात नागलीची लागवड केली जाते. हलक्या सरीचा पाऊससुद्धा यासाठी चालू शकतो. रोपे तयार झाल्यावर उशिरा लावणी करुनसुद्धा नागलीचे चांगले पीक येऊ शकते. त्यामुळे नागली पीक घेणे योग्य आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. भाताची लावणी अजूनही संपलेली नाही. भात लावणीला उशीर झाला आहे. त्यामुळे भात पिकाच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाणथळ जमिनीत शेतकऱ्यानी भातलावणी केली आहे. परंतु ज्या ठिकाणी पाणीच नाही, त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची भात लावणी रखडली आहे. शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा पर्याय स्वीकारायला हवा. पेरणी झाल्यावर किंवा लावणी झाल्यावर पावसाने दडी मारली तर शेततळ्यातील पाणी देऊन भाताची रोपे जगवता आली पाहिजेत. त्यादृष्टीने शेतकऱ्याने आपल्या शेतीत पाण्याची सोय करायला हवी. भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्याने सर्व पर्याय उपलब्ध करुन घ्यायला हवेत.
शेतकरी दोन - तीन वर्षे जुनेच भात बियाणे वापरतात. परंतु दरवर्षी संकरित बियाणे वापरल्यास भातपीक जोमाने येते. परंतु तेच बियाणे दरवर्षी वापरल्यास त्याचा जोम कमी कमी होत जातो. भात पिकात अनेक संशोधन करुन शास्त्रज्ञ शेतकऱ्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देत आहे. बियाणे अधिक काळ टिकविण्यासाठी साठवण पद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. सध्या भात बियाण्याची साठवण करणारी पिशवी कापडी आहे. ही पिशवी केवळ एक ते दोन वर्षे टिकते. परंतु भात बियाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी बियाणे तीन ते चार वेळा वाळवून, प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग केल्याने दोन ते तीन वर्षे बियाणे चांगल्या पद्धतीने राहू शकते.

Web Title: Sufficient crop right on drought conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.