अवकाळी पावसाने झोडपले
By Admin | Updated: March 1, 2015 23:17 IST2015-03-01T22:51:05+5:302015-03-01T23:17:50+5:30
जिल्ह्यातील बागायतदारांना चिंता : झाडांची पडझड, वीजवाहिन्या तुटल्या

अवकाळी पावसाने झोडपले
दोडामार्ग/कसई दोडामार्ग : शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान जिल्ह्यासह दोडामार्ग तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. जवळपास दोन तासाहून अधिक काळ पाऊस कोसळत होता. या पावसामुळे तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ के व्ही विद्युत लाईनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यात ठिकठिकाणी काजू व आंबा बागायतदारांना बसणार असून, यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील हवामान उष्ण व दमट स्वरुपाचे होते. संध्याकाळच्या वेळेस तर जोरजोराने वारे वाहत होते. शिवाय वातावरणात आर्द्रता व बाष्पाचे प्रमाण देखील अधिक होते. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली जात होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही शक्यता खरी ठरली. अवकाळी पावसाने जवळपास दोन तासांहून अधिक काळ तालुक्यात हजेरी लावून झोडपून काढले. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य ३३ केव्ही लाईनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडीत होता. तर दूरध्वनी यंत्रणाही काही काळ बंद होती. रविवारी पहाटे पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळाने जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास एक तास पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोडपले. काही वेळ गारवाही जाणवला. मात्र, पुन्हा काहीवेळाने गर्मी वाढली. अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यात रविवारी निर्माण झाली होती.
शनिवारी व रविवारी अचानक पडलेल्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असून, तसे झाल्यास काजू बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार
आहे.(प्रतिनिधी)
अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंताग्रस्त
चारा, गवतासह सुपारी, मिरची पिक धोक्यात
वेंगुर्ले : रविवारी पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा पिकावर संकट आले आहे. सध्याचे वातावरण हे आंबा पिकाला पोषक नसल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे सूर उमटत आहेत. वेंगुर्ले शहरासह तालुक्यात हा अवकाळी पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत पडत होता. मात्र, कोणत्याही प्रकारच्या नुकसानी झालेली नव्हती.
यापूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाले होते. त्यावेळी आंब्याच्या झाडांना मोहोरही चांगला आला होता. परंतु त्या पावसाने आंबा बागायतदारांच्या मेहनतीवर पाणी पडले होते. त्यानंतर पिकसदृश असे वातावरण निर्माण झाल्याने बागायतदार आनंदीत होते. आंब्याच्या झाडांवरही फळे लागली आहेत.
मात्र, निसर्गात झालेल्या अचानक बदलामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले व मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे आंबा व काजू पिकांवर संकट आले आहे.
पावसाळी सदृश वातावरणामुळे काजू पिकात आलेल्या नवीन पालवीवर तसेच मोहोरावर ढेकण्या (टी-मॉस्किटो) या किडीचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी ५ टक्के प्रवाही लॅम्ब्डा सायहॅलॉथ्रीन या किटकनाशकाची ६ मिली प्रती १० लीटर पाणी या प्रमाणात संपूर्ण झाडावर
फवारावे. (प्रतिनिधी)
वीज वाहिन्यांवर झाड कोसळले
सावंतवाडी : रविवारी पहाटेच सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाने सुरुवात झाली. या पावसात सालईवाडा येथील मिलाग्रीस हायस्कूलसमोरील मोठे चिंचेचे झाड रस्त्यावर वीजवाहिन्यांवर पडून रस्त्यावर पडले. मात्र, पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला.
पावसाळ्याचे चार महिने संपले, तरी हिवाळ्यात चारही महिन्यात पावसाने आपला जोर कायम ठेवला होता. मात्र, हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत आला, तरी पावसाने आपली विस्तृतता वाढवून उन्हाळी हंगामातही अतिक्रमण केले आहे. सावंतवाडी तालुक्यात रविवारी पहाटे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोर धरला. पावसाळा हंगाम सुरू झाल्यासारखे पावसाने वातावरण करून संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने जोर धरला.
ग्रामीण भागातील लोकांची बाहेर ठेवलेली लाकडे, शेती, तसेच अन्य लाकडी सामान अचानक पावसाच्या पाण्यात भिजू लागल्याने सर्वांची पहाटेच झोप उडाली. अडगळीच्या भागात ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट या सर्वांना आज अचानक सर्वांना बाहेर काढाव्या लागल्या. पहाटेच ५ च्या सुमारास सालईवाडा मिलाग्रीस स्कूलच्या मागील गेटजवळ रस्त्यालगतचे मोठे चिंचेचे झाड वीजवाहिन्यांवर पडून रस्त्यावर कलंडले. यावेळी विद्युत वाहिन्यांवरील विद्युत पुरवठाही सुरू होता. मात्र, पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. विद्युत पुरवठा बंद करून पडलेले चिंचेचे झाड बाजूला केले. (वार्ताहर)
कुडाळातही संततधार
कुडाळ तालुक्यात दोन दिवस पावसाची संततधार सुरुच आहे. शनिवारी दिवसभरात काही थेंब बरसल्यानंतर रात्रीच्या सुमारास कुडाळ परिसरात पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या. यामुळे आंबा व काजू बागायतींचे नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी बागायतदारांमधून केली जात आहे. तसेच रविवारी सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसाने सर्वसामान्यांचीही त्रेधातिरपीट उडविली होती.