शाळांमध्ये स्टडी फिवर
By Admin | Updated: January 29, 2015 00:10 IST2015-01-28T22:10:22+5:302015-01-29T00:10:31+5:30
परीक्षा आल्या जवळ : विद्यार्थी गुंतले अभ्यासात

शाळांमध्ये स्टडी फिवर
टेंभ्ये : ‘स्नेहसंमेलन, फनिगेम्स, कॉलेज डेज’चे मंत्रमुग्ध करणारे वातावरण आता शाळा, कॉलेजमधून ओसरले असून, सध्या विद्यार्थ्यांमध्ये स्टडी फिवर पाहायला मिळत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने शाळांमधून सध्या मोठ्या प्रमाणात या परीक्षांची तयारी करुन घेतली जात आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर झाले आहे. यानुसार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. ५ मार्चपासून सुरु होत आहेत. त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दोन ते तीन आठवड्यापर्यंत दहावी, बारावीच्या तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. भाषा विषयासाठी दहावी व बारावीसाठी २० गुणांची तोंडी परीक्षा शिक्षण मंडळाने निश्चित केली आहे. बारावी कला शाखेतील भाषा विषयवगळता अन्य विषयांसाठी प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. बारावीच्या तिन्ही शाखांच्या व दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची पूर्वतयारी शाळास्तरावर जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.नुकतीच पूर्व परीक्षा संपली असल्याने काही शाळांमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थाचालक यांच्या संयुक्त सभा आयोजित करुन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणा दिली जात आहे. ग्रामीण भागातील काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अभ्यासिकांचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. आॅनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना पूर्वीच वेळापत्रक मिळाल्यामुळे वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरु आहे.सध्या कोकणात क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरु असल्याने क्रिकेटवेड्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही प्रमाणात खंड पडण्याची शक्यता पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वच शाळांमधून जादा अभ्यासवर्ग घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शाळा ग्रामीण वा शहरी कोणत्याही भागातील असो. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये स्टडी फिवर पाहायला मिळत आहे. अभ्यास एके अभ्यास या तत्त्वाप्रमाणे विद्यार्थी अभ्यास करताना दिसत आहेत. (वार्ताहर)