विद्यार्थी रमले व्यवसायाभिमुख कार्यशाळेत

By Admin | Updated: October 17, 2014 22:56 IST2014-10-17T21:12:57+5:302014-10-17T22:56:24+5:30

शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने

Students take a business-oriented workshop | विद्यार्थी रमले व्यवसायाभिमुख कार्यशाळेत

विद्यार्थी रमले व्यवसायाभिमुख कार्यशाळेत

रत्नागिरी : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित इंग्रजी माध्यमाची शाळा, डेरवण येथे यंग आंत्रप्रेन्यर क्लब अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने प्रतिवर्षी विविध प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी पणत्या सुशोभिकरण, सुगंधी उटणे व मेणबत्ती उत्पादन व विक्री कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या सगळ्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले. कार्यशाळेमध्ये इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी मेणाद्वारे ट्री लाईट्स, विविध प्रकारची फळे, फुले, विविध आकाराचे साचे वापरून सुबक, रंगीबेरंगी मेणबत्त्यांची निर्मिती केली. या कार्यशाळेत जेलीवॅक्सपासून मेणबत्ती तयार करणे, हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी काचेच्या विविध आकाराच्या ग्लास व बाऊल्समध्ये शंख, शिंंपले, रंगीत मणी, विविध रंगीत रांगोळी, डाळी, कडधान्ये यांची सुबक रचना करून जेलीवॅक्सपासून आकर्षक रंगीत मेणबत्त्या तयार केल्या. सर्वच प्रकारच्या मेणबत्त्या विविध प्रकारची इसेन्स वापरून सुगंधीत करण्यात आल्या. या कार्यशाळेत सुवासिक व उच्च प्रतीच्या आयुर्वेदिक उटण्याची निर्मितीदेखील विद्यार्थ्यांनी केली. उटण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या औषधी चुर्णाचे योग्य प्रमाणानुसार एकत्रिकरण करणे, त्याचे वजनानुसार पॅकिंग करणे, या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी सराईतपणे केल्या. पॅकिंग करण्यासाठी आधुनिक पॅकिंग मशिनचा वापर विद्यार्थी सहजगत्या करीत होते.
कार्यशाळेअंतर्गत विविध आकाराच्या व प्रकारच्या पणत्यांना विविध रंगांनी रंगविणे, त्यावर कुंदन, काचा, रंगीबेरंगी टिकल्या, मणी, यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी पणत्यांचे सुशोभन करण्यात आले. या पणत्या रंगवत असताना विद्यार्थ्यांनी अनेक नाजूक साहित्य अत्यंत सफाईदारपणे वापरून पणत्यांना आकर्षक रूप प्राप्त करून दिले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, सांघिक भावना, व्यावसायिक मानसिकता, सर्जनशीलता विकसीत होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार कार्य देण्यात आले. कौशल्यावर आधारित उपक्रम आयोजित केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे हा उद्देश.
दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन.
रंगीत मेणबत्त्या तयार करण्यास कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा फायदा भावी आयुष्यासाठी.
विद्यार्थ्यांचे कौशल्य पणाला.

Web Title: Students take a business-oriented workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.