विद्यार्थ्यांनी गावाचेही नाव उज्ज्वल करावे
By Admin | Updated: February 26, 2015 00:14 IST2015-02-25T21:55:29+5:302015-02-26T00:14:59+5:30
संदेश सावंत : ओसरगाव येथे वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू

विद्यार्थ्यांनी गावाचेही नाव उज्ज्वल करावे
कणकवली : विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळाले तर भावी पिढी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. यासाठीच ओसरगाव येथील पूर्ण प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणासाठी तसेच वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी १८ लाखांचा निधी देण्यात आला आहे. या शाळेच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन शाळेबरोबरच आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी केले.ओसरगाव पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ येथे बुधवारी वर्गखोल्यांचे भूमिपूजन मंगळवारी झाले. यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, गटशिक्षणाधिकारी अनिल कांबळे, केंद्रप्रमुख श्रीमती कवठकर, सरपंच वनिता चौकेकर, उपसरपंच गुरूदास सावंत, दिनेश अपराध, शालेय समिती अध्यक्षा पल्लवी राणे, उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, पोलीसपाटील कृष्णा तांबे, ग्रामसेवक कांबळे, प्रकाश कदम, माजी सरपंच अर्जुन देसाई, प्रदीप कदम, मुख्याध्यापक गोसावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गोसावी यांनी स्वागत केले. आभार पल्लवी राणे यांनी मानले. (वार्ताहर)
१८ लाखांच्या निधीची तरतूद
संदेश सावंत म्हणाले, ओसरगाव येथील या प्राथमिक शाळेबाबत काही कारणांमुळे वाद निर्माण झाला होता. येथील ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना मी या शाळेला भेट दिली. शाळेची पाहणी केल्यानंतर नवीन वर्गखोल्या बांधण्याची येथे आवश्यकता असल्याचे लक्षात आले. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी १८ लाखांच्या निधीची तरतूद आम्ही केली आहे. त्यापैकी शाळेच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ८ लाख रूपये, तर नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निधी शाळेकडे वर्ग करण्यात आला आहे. या शाळेच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी करून घेऊन आपले भविष्य उज्ज्वल बनवावे.