दिशा देण्याचे काम विद्यार्थीच करु शकतात
By Admin | Updated: February 24, 2015 00:01 IST2015-02-23T21:59:38+5:302015-02-24T00:01:27+5:30
दीपक केसरकर : बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे चित्रप्रदर्शन सुरू

दिशा देण्याचे काम विद्यार्थीच करु शकतात
सावंतवाडी : महाराष्ट्रात दहा हजार कोटी रस्त्यांसाठी गेले. तरीही रस्त्यांची दुरवस्था तशीच आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम विद्यार्थीच करू शकतात. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रत्येक कामाच्या सुपरव्हिजनची जबाबदारी विद्यार्थ्यांकडे देणे आवश्यक आहे, असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ‘कल्पक’ बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजच्या स्रेहमेळाव्यात बक्षीस वितरण आणि चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रविवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शंकर कांबळी, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अरुण पणदूरकर, रमेश भाट, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, शाम भाट, केदार बांदेकर, प्राचार्य दिलीप धोपेश्वरकर, पल्लवी केसरकर आदी उपस्थित होते. कल्पक आर्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची शक्ती अफाट आहे. सावंतवाडीसारख्या लहान शहरात अशा आर्ट कॉलेजची निर्मिती होणे, हे सावंतवाडी शहराचे भाग्य आहे, असेही यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले. कला ही उपजत असते. कला विद्यार्थ्यांमध्ये घडवायची असते. हे घडविण्याचे काम मुख्याध्यापकांचे हिताचे असते. त्यामुळे सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचे त्यांनी कौतुक केले. तसेच महाराष्ट्र घडविण्यासाठी युवाशक्तीची गरज आहे. ही युवाशक्ती वापरा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी प्रयत्न करा, असेही यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले व मुलांना शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, कै. बाळभाई बांदेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा आदर्श घ्या. त्यांचे कार्य आत्मसात करून यश संपादन करा, असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)