पारंपरिक मच्छिमारांचा संघर्ष सुरुच
By Admin | Updated: November 28, 2014 23:56 IST2014-11-28T22:03:02+5:302014-11-28T23:56:34+5:30
तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरुच : दोन पर्ससीन ट्रॉलर्सच्या मालकांना समज

पारंपरिक मच्छिमारांचा संघर्ष सुरुच
मालवण : अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांनी हाती घेतलेले कारवाईचे सत्र शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होते. पारंपरिक मच्छिमारांनी शुक्रवारी तळाशिल समुद्रात मासेमारी करीत असलेल्या दोन पर्ससीन ट्रॉलर्सला पकडून त्यांच्या मालकांना समज दिली. पर्ससीनविरोधी कारवाईत दांडी, धुरीवाडा, तळाशिल या भागातील २५० ते ३०० पारंपरिक मच्छिमार सहभागी झाले होते. अनधिकृत विनापरवाना मासेमारीविरोधात शासनाकडून कारवाईची योग्य पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत पारंपरिक मच्छिमारांचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे पारंपरिक मच्छिमारांच्या नेत्यांनी सांगितले.
गेले दोन दिवस निवती व मालवण येथील तीन पर्ससीननेट नौकांवर कारवाई करून त्यांना समज दिल्यानंतर शुक्रवारी पारंपरिक मच्छिमारांनी आपला मोर्चा तळाशिल व आचऱ्याच्या दिशेने वळविला आहे. तळाशिल समुद्रात आज सकाळी काही गोव्याच्या व आचरा येथील काही पर्ससीन ट्रॉलर्स १० वावाच्या आत येऊन समुद्रात मासेमारी करीत असल्याची माहिती पारंपरिक मच्छिमारांना समजली. अनधिकृत पर्ससीन विरोधात कारवाईचे सत्र सुरू असतानाही मासेमारी करीत असलेल्या पर्ससीनला जरब बसावी यासाठी दांडी, धुरीवाडा, तळाशिल येथील सुमारे २०० ते ३०० मच्छिमारांनी समुद्राच्या दिशेने धाव घेतली.
मच्छिमारांनी सहा यांत्रिकी नौकांच्या सहाय्याने पर्ससीन ट्रॉलर्सचा पाठलाग केला. यावेळी तळाशिल- तोंडवळी येथील स्वप्नील पराडकर, गोपी तांडेल, विजयश्री तांडेल यांचे दोन पर्ससीननेट ट्रॉलर्स पकडले. यानंतर त्यांना समज देण्यासाठी दांडी येथील चौकचार मंदिरात दुपारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत आपल्याकडून यापुढे पारंपरिक मच्छिमारांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नसल्याचे कबूल केल्यानंतर त्यांना माघारी पाठविण्यात आले. यापुढे अनधिकृत मासेमारी सुरूच राहिली तर यापेक्षाही लढा तीव्र करू, असा इशारा पारंपरिक मच्छिमारांनी दिला. (प्रतिनिधी)
किनारपट्टीवर अनधिकृत पर्ससीननेटधारक नौका राजरोसपणे अतिक्रमण करीत असताना शासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. अनधिकृत मासेमारीला कोणतेही निर्बंध राहिलेले नसून त्यांना शासनाकडून अभय मिळत आहे. पर्ससीन नौकांच्या या अतिक्रमणामुळे पारंपरिक मच्छिमारांचा मासेमारी व्यवसाय बुडत चालला आहे. जगण्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
- छोटू सावजी, अध्यक्ष, मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघ