गुहागरात कडव्या संघर्षाची लढत अटळ
By Admin | Updated: September 23, 2014 23:52 IST2014-09-23T22:03:25+5:302014-09-23T23:52:25+5:30
युतीकडून विनय नातू यांच्यासमोर भास्कर जाधव यांची होणारी लढत संघर्षमय होणार हे निश्चित आहे.

गुहागरात कडव्या संघर्षाची लढत अटळ
संकेत गोयथळे - गुहागर -मागील विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदारसंघावरुन वाद झाल्याने युती असूनही डॉ. विनय नातू व रामदास कदम एकमेकांविरोधात लढले. यात युतीच्या मतांचे विभाजन झाल्याने राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विजयी झाले. युतीच्या मतांची बेरीज करता जाधव यांना मिळालेल्या मतांपेक्षा तब्बल सतरा हजारांनी अधिक होते. मागील पाच वर्षात राज्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कामगारमंत्री या माध्यमातून सातत्याने मतदारसंघाशी असलेला संपर्क लक्षात घेता भास्कर जाधव विरोधात विनय नातू अशी थेट लढत कडव्या संघर्षाची होईल, असे चित्र आहे.कै. डॉ. तात्या नातू यांच्यानंतर तब्बल चार वेळा विनय नातू यांनी आमदारकी भूषविली. मतदारसंघाच्या फेररचनेत बदल झाल्याने तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा खेड मतदारसंघ गायब झाला. या मतदारसंघातील मोठा भाग गुहागर मतदारसंघाला जोडला गेला. ही जागा शिवसेनेकडे असल्याचे अखेरच्या क्षणी जाहीर केल्याने नाराज विनय नातूंनी श्रीधर सेनेच्या माध्यमातून बॅट या निशाणीवर निवडणूक लढवली.युतीच्या मतविभाजनामुळे निवडणूक निकाल नेहमीपेक्षा अनपेक्षित होता. पहिल्यांदाच या मतदारसंघातील शिवसेना व भाजपची नक्की मते किती हे स्पष्ट झाले. ऐनवेळी येऊन प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या रामदास कदम यांनी ४० हजार मते घेऊन सर्वांना अचंबित केले. कारण वर्षानुवर्षे भाजपचा आमदार असल्याने शिवसेनेला नगण्य समजून दुजाभावाची वागणूक दिली जात होती. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. विनय नातू यांना ३० हजार, तर भास्कर जाधव यांना ५३ हजार मते मिळाली.
यावेळी युतीबरोबर भास्कर जाधव यांना सामोरे जाताना मागील निवडणुकीमधील युतीच्या मतांची गोळाबेरीज करताना ७० हजार होते. जाधव यांना मिळालेल्या मतांपेक्षा १७ हजारांनी जास्त आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता हे मताधिक्य तुटल्याचे लक्षात येते. एकमेव गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंना २५०० मतांचे मताधिक्य मिळवून दिले.विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाने खचलेल्या नातू यांनी राजकीय संन्यास घेतल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. रामदास कदम यांनी तर मागील पाच वर्षांत दोनवेळा घेतलेल्या सभा वगळता पुन्हा फिरकलेच नाहीत. याउलट भास्कर जाधव यांनी नगरविकास राज्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद व कामगारमंत्री म्हणून मतदारसंघाशी सातत्यपूर्वक संपर्क ठेवला. गुहागर पंचायत समिती व त्यानंतर गुहागर नगरपंचायत ताब्यात घेऊन विजयी घोडदौड काम ठेवली आहे. आक्रमक शैलीमुळे भास्कर जाधवांवर काही राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते नाराज आहेत. याचा फायदा भाजप-सेना किती घेईल, हा प्रश्न आहे. शिवसेनेमध्येही अनंत गीते व रामदास कदम असे दोन गट आहेत. मात्र, कदम गट नातू यांना मनापासून सहकार्य करेल, याबाबत त्यांना शंका आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रचारक असलेले नीलेश राणे यांनी भास्कर जाधवांविरोधात सरळ सरळ दंड थोपटले आहेत. काँग्रेसची मते अन्य ठिकाणी फिरवण्यात त्यांना यश येईल का? जाधव यांचे अन्य कट्टर राजकीय विरोधक रमेश कदम यांना लोकसभेला गुहागरमधून आठ हजार मते मिळाली. ही मते कदम अन्य ठिकाणी वळवतील, असेही बोलले जात आहे.
यातूनच भास्कर जाधव यांनी गेल्या पाच वर्षांत विविध पदांवरून विकासकामांच्या जोरावर युतीचे मताधिक्य तोडता येईल, एवढी ताकद निर्माण करताना अंतर्गत शत्रूही मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहेत. अशा स्थितीत युतीकडून विनय नातू यांच्यासमोर भास्कर जाधव यांची होणारी लढत संघर्षमय होणार हे निश्चित आहे.