आचरा बंदरात संघर्ष; २५ जखमी
By Admin | Updated: November 1, 2015 00:08 IST2015-10-31T23:13:44+5:302015-11-01T00:08:13+5:30
पोलिसांवरही हल्ला : पर्ससीन-पारंपरिक मच्छिमार भिडले

आचरा बंदरात संघर्ष; २५ जखमी
आचरा/मालवण : पर्ससीन व पारंपरिक मच्छिमारांमध्ये आचरा बंदर येथे शनिवारी सायंकाळी जोरदार संघर्ष झाला. यावेळी दोन पर्ससीन जाळ्यांसह एक बोट पेटवून देण्यात आली. दोन्ही गटांतील मच्छिमार व महिलांसह २० ते २५ जण जखमी झाले, तर एक महिला पोलीस कर्मचाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, आचरा पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करून परिस्थिती काहीशी नियंत्रणात आणली.
जखमींवर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. यातील विजय ढोके, साईन मुजावर, फिरोज मुजावर व महिला पोलीस कर्मचारी दर्शना पालकर या गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालय व गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. आचरा येथील तणाव स्थितीनंतर पोलिसांनी जादा सशस्त्र पोलीस बंदोबस्त मागविला आहे.
शुक्रवारी आचरा बंदरात पारंपरिक मच्छिमारांनी अनधिकृत मिनीपर्ससीन विरोधात उपोषण आंदोलन छेडले होते. यावेळी मत्स्य विभागाने १६ अनधिकृत मिनीपर्ससीन बोटींवर कारवाई केली. उपोषण मागे घेतल्यानंतर रात्री पारंपरिक मच्छिमार व स्थानिक पर्ससीननेटधारकांत वादाची ठिणगी पडली. त्यानंतर मालवणात पारंपरिक मच्छिमारांनी बैठक घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली होती. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आचरा येथील स्थानिक मिनीपर्ससीनधारक व पारंपरिक मच्छिमार यांच्यात वाद झाला. हा वाद काही क्षणातच (पान १० वर)
शिगेला पोहचला. मालवणातील शेकडो पारंपरिक मच्छिमार आचरा बंदरात दाखल झाले. त्यानंतर स्थानिक पर्ससीन मच्छिमार व पारंपरिक मच्छिमारांत जोरदार राडा झाला. काहीजणांनी किनाऱ्यावरील पर्ससीनची जाळी व बोटींना आग लावली.
आमदारांवर मच्छिमारांची नाराजी
आमदार वैभव नाईक घटनास्थळी दाखल झाले असता मच्छिमारांनी शुक्रवारी संघर्ष आंदोलन सुरु असताना आपण होता कुठे? असा सवाल करत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आमदार नाईक यांनी या वादास मत्स्य विभाग व मत्स्योद्योग मंत्री जबाबदार आहे, असा आरोप केला. त्यांच्याकडे वारंवार बैठकीची मागणी करूनही बैठक लावली नाही. त्यामुळेच हा जीवघेणा संघर्ष घडला असे सांगत मच्छिमारांना न्याय मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
पोलीस छावणीचे स्वरूप व धरपकड मोहीम :
आचऱ्यातील या संघर्षानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी, दंगा काबू पथक आचऱ्यात दाखल झाले. आचरा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांनीही धरपकड मोहीम सुरु केली आहे. काही आंदोलनकर्त्यांवर रात्री उशिरा पोलिसांची कारवाई सुरु होती. संघर्षानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, व्यापारी व ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. या घटनेमुळे आचऱ्यातील शांततेला गालबोट लागले असल्याचा सूर होता.(प्रतिनिधी)
जोरदार दगडफेक
या संघर्षात दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. काही जणांनी घरात घुसून मारहाण केली. शिगा, दांडे, फावडे आदींचा वापर करताना डोळ्यात मसाला फेकही करण्यात आली. वाद मिटवण्यास पुढे आलेल्या पोलीस व पत्रकारांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. यात महिला पोलीस दर्शना पालकर गंभीर जखमी झाल्या, तर अक्षय भेंडे, सचिन जाधव, कैलास ढोले हे पोलीस कर्मचारी जखमी झाले.
दोन्ही गटाचे मच्छिमार जखमी
या संघर्षात दोन्ही बाजूचे २० ते २५ मच्छिमार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला व मुलांचाही समावेश आहे. या जखमींमध्ये विजय ढोके, सतीश भगत, शाइन मुजावर, फिरोज मुजावर या चार गंभीर जखमींना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. तर मनवेल गोन्साल्वीस, द्वारकानाथ पेडणेकर, इमरान मुजावर, आबू वाक्कर मुजावर, भाऊ मोरजे, विना साळकर, रामडू पेहराव, सकलीन मुजावर, अब्कुर मुजावर, वसंत मिसाळ, पिकेश्वर चंदन, समीर मुजावर, इमरान काझी, राजू मुल्ला, नजमुद्दीन मुल्ला, जान्गीयार मुंडल, नुर्हस्न मुंडल यासह अन्य मच्छिमारांवर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.