तेलींना उमेदवारी दिल्यास प्रखर विरोध
By Admin | Updated: September 17, 2014 22:27 IST2014-09-17T21:13:12+5:302014-09-17T22:27:44+5:30
सतीश सावंत : सावंतवाडीत काँग्रेसची विधानसभा मतदारसंघ बैठक

तेलींना उमेदवारी दिल्यास प्रखर विरोध
सावंतवाडी : कार्यकर्त्यांना कधी साधा चहा न देणारे माजी आमदार राजन तेली गावागावात जाऊन गाव पुढाऱ्यांना पैसे कुठून देतात? हे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित करत यापुढे गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसू नका. तसेच या मतदारसंघात तेली यांना उमेदवारी दिली असल्यास प्रखर विरोध राहील, असे पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांना देण्यात येईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी सावंतवाडी येथील काँग्रेसच्या विशेष बैठकीत सांगितले.
तसेच यावेळी माजी आमदार राजन तेली यांच्या विरोधात काम करण्याचा ठरावही संगनमताने घेण्यात आला. येथील मातृछाया मंगल कार्यालयात काँग्रेस विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले हाते.
यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अॅड. दिलीप नार्वेकर, वसंत केसरकर, प्रांतिक सदस्य विकास सावंत, संदीप कुडतरकर, काँग्र्रेस प्रवक्ते राजेंद्र परूळेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी, दोडामार्ग अध्यक्ष राजू निंबाळकर, अंकुश जाधव, प्रमोद कामत, एम. के. गावडे, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, सभापती प्रमोद सावंत उपस्थित होते.
नीतेश राणे यांच्या स्टेटमेंटचे कारण साधून स्वत:च्या स्वार्थापोटी तेली हे वेळोवेळी लांब राहिले, असेही यावेळी सावंत यांनी सांगितले. माजी आमदार दीपक केसरकर हे आधीपासूनच आमचे शत्रू आहेत. आता या पंगतीत राजन तेली हे देखील बसले आहेत. त्यामुळे हे दोन्ही आपले शत्रू आहेत. राजन तेली यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सिंधुदुर्ग जिल्हा बँक पवारांना देण्याच्या आश्वासनाने झाला असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत. यामुळे हे नवीन काँग्रेसवाले जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत आहेत, असे दिलीप नार्वेकर यांनी सांगितले. जे नारायण राणेंच्या विरोधात गेले, त्यांच्याशी हात देण्याची गरज नाही. काँग्रेसमध्ये राहून पोखरायची कामे करू नका. काँग्रेसमधून जर कोणी काँग्रेस पोखरायची कामे करीत असल्यास त्यांची तंगडी तोडू, असे मनिष दळवी यांनी सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी यांना लढत द्यायची असेल, तर काँग्रेसने एकसंघ राहिले पाहिजे, असे बाळा गावडे म्हणाले.
सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले तालुका अध्यक्ष मनीष दळवी, दोडामार्ग तालुका अध्यक्ष राजू निंबाळकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष बाळा गावडे या तीन तालुकाध्यक्षांच्या कार्यकारिणीने राजन तेली यांचा प्रचार न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात
आला. (वार्ताहर)