शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दलालांना हाकला
By Admin | Updated: May 29, 2015 00:01 IST2015-05-28T23:21:36+5:302015-05-29T00:01:50+5:30
रामदास कदम : खारी देवणेत बांधकाम मंत्र्यांच्याहस्ते पुलाचे भूमिपूजन

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दलालांना हाकला
खेड : कोकणात आंबा आणि काजू मोठ्या प्रमाणात पिकतो. मात्र, येथील व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या या पिकांना संरक्षण मिळत नाही. पिकाला हमी मिळत नाही. इथल्या पिकांचा नफा दलालांच्या घशात जातो. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रथम दलालीतून बाहेर काढणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. कोकणातील आंबा आणि काजू बोर्डाला १00 कोटी रुपये देण्याची मागणीही कदम यांनी या बोर्डाचे प्रमुख आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. कोकणातील लोकांना संघर्षाशिवाय काही मिळत नसल्याची खंत यावेळी कदम यांनी व्यक्त केली.
खेड तालुक्यातील खारी-देवणे येथील ८ कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी १0 वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पर्यावरणमंत्री रामदास कदम बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अरूणा आंबे्र, रमेश भागवत, संजय बुटाला अॅड. मिलिंद जाडकर, खेडचे सभापती चंद्रकांत कदम, भगवान घाडगे यांच्यासह असंख्य लोक उपस्थित होते.
देवणे पुलाचा खाडीपट्टा, खेड व दापोली तालुक्यातील ४५ गावांना लाभ होणार आहे. रामदास कदम यांनी कोेकणातील समुद्रकिनारी लगतचे सीआरझेड कायदयामध्ये शिथीलता आणावी असे सांगत येथील पर्यटनासाठी आघाडी सरकारने राखुन ठेवलेले २२0 कोटी रूपये परत गेल्याने ती चूक सेना भाजपा सरकार करणार नसल्याचे स्पष्ट केले.
देवणे पुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर बिरमणी हातलोट घाटाच्या आणि रस्त्याच्या ८ कोटी रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजनही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार असल्याने या मार्गाला मोठे महत्व आले आहे. याकरीता पंकजा मुंडे यांनी २ कोटी २५ लाख रूपये दिले आहेत.
बांधकाम मंत्र्यांनी पाडला पैशाचा पाऊस
रत्नागिरी जिल्ह्याला यापुढे भरघोस मदत देण्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रस्ते विकासासाठी निधी अपुरा असल्याचे सांगितल्यानंतर पाटील यांनी जिल्ह्याला रस्त्यांसाठी येत्या पुरवणी अधिवेशनात १0 ऐवजी ११ कोटी रूपये देण्याची घोषणा पाटील यांनी केली. वायकर यांनी जिल्ह्यातील साकव बांधकामास अपु-या निधीबाबत सुतोवाच केल्यानंतर पाटील यांनी २0 लाखाच्या ऐवजी आपण येत्या १0 दिवसात ३५ लाख रूपये देण्याचे जाहीर केले. साकव आणि रस्त्यांसाठी मिळून १६ कोटी रूपये जादा देण्याची घोषणा त्यांनी या कार्यक्रमात केली.